युद्धजन्य परिस्थिती असलेल्या प्रदेशात सेवा बजावणे तसे अवघड. त्यातही ते युद्ध गनिमी पद्धतीचे असेल तर आणखी जिकरीचे. मग ती सेवा प्रशासकीय स्वरूपाची असो वा शत्रूशी दोन हात करावे लागणाऱ्या सुरक्षा दलाची. इतकेच काय तर अशा क्षेत्रात पत्रकारिता करणे सुद्धा कठीण. त्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला व आता घेत सुद्धा आहेत. अशा प्रतिकूल स्थितीत कार्य करताना एकही चूक न होऊ देणे केवळ अशक्य. आणीबाणीच्या परिस्थितीत घेतलेले निर्णय प्रत्येकवेळी बरोबर ठरतातच असेही नाही. व्यक्ती कितीही प्रशिक्षित असो कठीण स्थितीत पावले उचलण्याची वेळ आली की एखाद्या क्षणी तरी त्याचा विवेक ढळतो. त्यामुळे अशा क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचे मूल्यमापन चूक व बरोबर काय अशा दोन्ही पातळीवर केले जाते. ही जगभरातील प्रचलित पद्धत. तीच युद्धजन्य स्थिती असलेल्या नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी लागू पडते. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या कामगिरीकडे बघितले की त्यातले उजवेपण अधिक नजरेत भरते. खरे तर ते तिथे नोकरीच्या निमित्ताने कर्तव्य बजावत आहेत. मग त्यांचे कौतुक कशाला असा प्रश्न साहजिकच. त्यात तथ्यही आहे. मात्र आजकाल प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्यांची संख्याच रोडावलेली. त्यामुळे प्रामाणिक अधिकारी चारचौघात पटकन उठून दिसतो. निलोत्पल त्यातले एक यात शंका नाही. पण केवळ या एकाच कारणासाठी त्यांचे कौतुक नाही. सध्या मनुष्यबळाच्या अभावामुळे पार मोडकळीस आलेल्या नक्षलींविरुद्ध त्यांनी ज्या पद्धतीने कामगिरी केली ती प्रशंसनीय म्हणावी अशीच. ते रुजू झाले तेव्हा गडचिरोलीत सशस्त्र नक्षलींची संख्या होती ८९. आता पाऊणेदोन वर्षात हा आकडा झाला ४७. म्हणजे जवळजवळ पन्नास टक्क्याची कपात. हे यश लक्षणीय.

एकेकाळी याच जिल्ह्यात आठशे ते हजार नक्षलींचा वावर असायचा. नंतर हळूहळू तो कमी होत गेला. या जिल्ह्यात अधीक्षकपदाची धुरा सांभाळणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचे श्रम त्यासाठी कारणीभूत ठरले. त्यालाच समोर नेण्याचे काम या अधिकाऱ्याने केले. आजच्या घडीला उत्तर गडचिरोलीत नक्षलींचे एकही दलम कार्यरत नाही. नक्षलमुक्त प्रदेश अशी त्याची गणना सध्यातरी करता येईल. दक्षिण गडचिरोली हा नक्षलींचा बालेकिल्ला. तोही गेल्या चाळीस वर्षांपासून. छत्तीसगड व तेलंगणाला लागलेला हा भाग दळणवळणासाठी नक्षलींना सोयीचा. तिथेही आता केवळ तीन दलम व एक कंपनी शिल्लक उरलेली. त्यांनाही संपवू असा निर्धार ते व्यक्त करतात. हे सारे यश त्यांच्या नावावर जमा झाले ते केवळ खबऱ्यांचे उत्कृष्ट जाळे व सी-६० कमांडो पथकाच्या कामगिरीमुळे. गडचिरोलीतील हे पथक आजवर लष्कराच्या तोडीची कामगिरी सातत्याने बजावत आलेले. सुरक्षा दलातील अनेक आस्थापनांनी गडचिरोलीत येऊन या पथकाच्या कार्यशैलीचा अभ्यास केलेला. अशा पथकाच्या यशाची भूक अवलंबून असते ती अचूक व योग्य माहिती आणि दूरदर्शी नेतृत्वावर. निलोत्पल यांनी नेमके यावरच लक्ष केंद्रित केले.

dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and Congress president Mallikarjun Kharge.
Razakar violence explained: रझाकारांनी खरगेंच्या कुटुंबीयांची हत्या केली? योगी आदित्यनाथांच्या टीकेमागचा खरा इतिहास काय?
hinganghat vidhan sabha constituency
हिंगणघाटमध्ये बंडखोर उमेदवार निर्णायक ठरणार ?
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन

अगदी काही वर्षांपूर्वी गडचिरोलीत दूरसंचारचे जाळे नव्हते. पोलिसांच्या प्रयत्नामुळे शंभरच्या वर टॉवर्स उभारले गेल्याने दळणवळण सुकर झाले. त्याचा खूप फायदा माहिती वेळेत मिळण्यात झाला व नक्षली या कमांडोंच्या सापळ्यात अडकत गेले. या जिल्ह्यातील शोधमोहिमा हे एक दिव्यच असते. शंभरवेळा मोहीम राबवली तर त्यातील एक यशस्वी होते. अशा स्थितीत इच्छाशक्ती कायम ठेवावी लागते व ती केवळ नेतृत्वाच्या प्रोत्साहनामुळेच टिकते. निलोत्पल यांनी अचूक माहिती व योग्य कारवाई याच सूत्राचा वापर केला. या भागातील चकमकी कायम वादाच्या भोवऱ्यात अडकतात त्या त्यात निष्पाप माणसे मारली जातात या आरोपामुळे. गेल्या पाऊणेदोन वर्षात असा आरोप एकदाही झाला नाही. ४० पेक्षा जास्त नक्षली ठार करून सुद्धा. हे घडले ते केवळ पोलिसांनी दाखवलेल्या मानवी दृष्टिकोनामुळे. चकमकीची वेळ आली की नक्षली नेहमी गावकऱ्यांना ढाल म्हणून वापरतात व ते मारले गेले की कांगावा करतात. यातून स्थानिकांचा रोष नाहक वाढतो. नेमके हेच हेरून एकही सामान्य माणूस मारला जाणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली. मग तो नक्षलींचा समर्थक असला तरी. त्याचा खूप फायदा अचूक माहिती मिळण्यात झाला. यामुळे पोलीस सामान्यांचा विचार करतात असा संदेशही जनतेत गेला.

निलोत्पल यांचे आणखी एक यश म्हणजे त्यांच्या कार्यकाळात नक्षलींकडून एकही पोलीस जवान वा अधिकारी मारला गेला नाही. युद्धात दोन्ही बाजूची हानी गृहीत धरली जाते. या पार्श्वभूमीवर ही कामगिरी उल्लेखनीय. सातत्याने अपयश येत गेले की सैन्यावरचा दबाव वाढतो. मग ते नक्षली असो की पोलीस. नेमका याचाच सामना करावा लागणाऱ्या नक्षलींवर दबाव वाढला व आत्मसमर्पणाचा सिलसिला या जिल्ह्यात सुरू झाला. या काळात अनेकांनी शस्त्रे टाकली. असे समर्पण घडवून आणताना सुद्धा मानवीय दृष्टिकोन बाळगावा लागतो. शत्रूच्या रक्ताची चटक लागण्याची सवय त्यागावी लागते. निलोत्पल यांनी याकडे जातीने लक्ष दिले. अनेकदा समर्पणासाठी निरोप पाठवून बाहेर येणाऱ्या नक्षलींना चकमक दाखवून ठार केले जाते. युद्धात हे गैर नाही पण समोरचा शत्रू सुद्धा याच देशाचा नागरिक आहे. भलेही तो वाट चुकला असेल पण जगण्याची संधी त्यालाही मिळायला हवी अशी भावना त्यांनी सहकाऱ्यांमध्ये निर्माण केली. त्यामुळे ९० गुन्हे दाखल असलेला व गडचिरोलीचा सर्वेसर्वा अशी ओळख असलेला गिरीधर पन्नास किलोमीटर पायी चालून समर्पणासाठी सुखरूप येऊ शकला. असे दुर्मिळ उदाहरण गडचिरोलीत पहिल्यांदाच घडले असावे. केवळ गिरीधरच नाही तर या चळवळीतील अनेकांना निलोत्पल यांनी समर्पणासाठी नातेवाईकांकरवी संदेश पाठवले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.

गडचिरोलीतील निवडणूक म्हणजे रक्तरंजित हे समीकरण ठरलेले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या वेळी याला छेद मिळाला. या काळात एकही हिंसक घटना घडली नाही. हा विक्रम सुद्धा निलोत्पल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावावर नोंदवला गेला. गडचिरोलीत मुख्य समस्या आहे ती रोजगार. येथे उद्योग उभारणीला सुरुवात झाली तरी त्यावरून टोकाचे दोन मतप्रवाह आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी कौशल्य विकास व पोलीस भरतीच्या माध्यमातून शेकडो तरुणांना विकासाच्या प्रवाहात आणले. दादालोरा खिडकी ही अंकित गोयलांनी सुरू केलेली योजना कायम ठेवली. एकीकडे असे प्रयत्न होत असताना वांगेतुरी, गर्देवाडा, पिपलीबुर्गी, मन्ने राजाराम या सीमावर्ती भागात रस्ते व पोलीस मदत केंद्रांचे जाळे विणून नक्षलींची चांगलीच कोंडी केली. वरिष्ठांचे सहकार्य व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रोत्साहनामुळे गडचिरोलीत पोलिसांची बाजू सध्या भक्कम दिसत असली तरी आता मूलभूत विकासाच्या योजना राबवून ती टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. त्यात यश मिळेल का याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेलच.

devendra.gawande@expressindia.com