देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन मोठ्या पक्षांचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातील असणे हा तसा दुर्मिळ राजकीय योग. गेल्या दोन वर्षापासून आपण तो अनुभवतोय. काँग्रेसची राज्याची धुरा नाना पटोलेंकडे सोपवल्यानंतर काही महिन्यांनी चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यामुळे एरवी राजकीयदृष्ट्या अडगळीत राहणाऱ्या विदर्भाचे महत्त्व राज्यात वाढले हे निश्चित. दोघेही वैदर्भीय असल्याने साहजिकच त्यांच्या कामगिरीची तुलना पण होऊ लागली. राज्यात झालेल्या काही निवडणुकांमध्ये यश मिळवल्याने पटोलेंची मान आणखी उंच झाली तर पराभव पदरी पडल्याने बावनकुळेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. राजकारणातील सक्रियतेचा विचार केला तर दोघेही तसे तत्पर. मेहनत करण्याची तयारी दोघांमधील समान गुण. माध्यमांसमोर सातत्याने बोलत राहिले की पक्ष वाढतो असा समज दोघांमध्ये पुरेपूर मुरलेला. तो खोटा हे अजूनही यांच्या लक्षात न आलेले. या तुलनेच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या यशापयशाचा धांडोळा घेतला तर अनेक नव्या बाबी समोर येतात. त्याचे बारकाईने निरीक्षण केल्यावर लक्षात येते ते दोघांचे अडचणीत सापडणे.

भाजपने बावनकुळेंना संधी दिली ती ओबीसी चेहरा म्हणून. मराठा आरक्षणाच्या घोळामुळे राज्यातील जातीय संतुलन बिघडले. ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. हा मोठा वर्ग दूर जाऊ नये यासाठी बावनकुळेंना आणले गेले. त्याला आता वर्ष होत आले तरी त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. यामुळे भाजपच्या वर्तुळात कमालीची नाराजी आहे. मुळात बावनकुळेंकडे ओबीसीचा चेहरा म्हणून बघणे हीच पक्षाची मोठी चूक होती. मागील निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारल्याने तेली समाज दुखावला गेला, सर्व ओबीसी नाही. हे लक्षात न घेता त्यांच्याकडे नेतृत्व सोपवले गेले. बावनकुळेंनी ओबीसांना जवळ करण्याचे भरपूर प्रयत्न केले पण त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. ओबीसींमध्ये जातीय उतरंड महत्त्वाची मानली जाते. त्याचा मोठा फटका बावनकुळेंना बसतोय. ओबीसींच्या हक्कासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना सध्या विदर्भात सक्रिय आहेत. त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न त्यांनी करून बघितला पण त्यातही म्हणावे तसे यश आले नाही. त्यावर पर्याय म्हणून इतर पक्षातील नेत्यांना भाजपत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. आशीष देशमुख, अशोक जिवतोडे ही त्यातली ठळक नावे. मात्र हे दोघेही नेते कमी व संस्थानिक जास्त. यातल्या जिवतोडेंनी तर प्रवेशाच्या वेळी पक्षाचे फलक मंडपात लावण्यास नकार दिला. आशीष देशमुख कितीकाळ शांत राहतील याचा अंदाज कुणी बांधू शकत नाही. तरीही हे दोघे तसेच इतरांच्या बळावर ओबीसींना सोबत घेण्याची वेळ बावनकुळेंवर येणे हेच त्यांचे अपयश दर्शवणारे. प्रदेशाध्यक्षांनी संघटनेला कार्यक्रम द्यायला हवा. तो यशस्वी होतो की नाही हे बघायला हवे. बावनकुळे स्वत:च सर्वत्र धावाधाव करताना दिसतात. एकट्याच्या बळावर पक्षाला विजय मिळवून देईल अशा अविर्भावात वावरत असतात. सामूहिक शक्तीवर विश्वास असलेल्या भाजपमध्ये हे शक्य नाही हे अजून त्यांच्या लक्षात आलेले नाही. पक्षप्रमुखाने कमी व प्रवक्त्याने जास्त बोलायला हवे हा साधा नियम सुद्धा ते पाळत नाहीत. असे मोठे पद मिळाले की महत्त्वाकांक्षा जागृत होते. त्यात गैर काही नाही पण त्याची वाच्यता करू नये या संकेताचे पालनही त्यांच्याकडून होताना दिसत नाही. सामूहिक नेतृत्व ही भाजपनेच राजकारणात रुजवलेली संकल्पना. अलीकडे त्याची याच पक्षात वानवा दिसते. बावनकुळेंची कार्यशैली सुद्धा ‘एकला चलो रे’ याच मार्गाने जाणारी. त्यामुळे मेहनत वाया जाण्याचा धोका अधिक. तो कसा हे ओबीसींच्या मुद्यावरून सहज लक्षात येते.

नाना पटोले हे सुद्धा सध्या याच वळणावरून वाटचाल करू लागलेत. काही निवडणुका जिंकल्या म्हणजे राज्यात यश मिळाले अशाच अविर्भावात ते सदैव असतात. पक्षातील एकही मोठा नेता त्यांच्यासोबत नाही. राहुल गांधींचा आशीर्वाद हीच एकमेव जमेची बाजू. सातत्याने माध्यमांसमोर जाऊन वादग्रस्त बोलण्याच्या सवयीला त्यांनी थोडा आवर घातला असला तरी संघटनात्मक पातळीवरचे त्यांचे अपयश आता साऱ्यांच्या नजरेत भरू लागलेले. पक्षातील प्रत्येक नेत्याला डावपेचात चीत कसे करता येईल यातच त्यांचा बराच वेळ जातो. चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षाला काढणे हे अलीकडचे उत्तम उदाहरण. तेही मेहनती आहेत. प्रचंड फिरतात पण ठिकठिकाणच्या नेत्यांना विश्वासात घेत नाहीत. पक्ष कोणताही असो. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे नेते असतात. कार्यशैली, स्वभाव यात फरक असतोच. अशा सर्वांना सोबत घेऊन चालण्याशिवाय पर्याय नाही हे अजूनही नानांच्या लक्षात आलेले नाही. एकट्याच्या बळावर पक्षाला यश मिळवून देण्याची क्षमता राहुल गांधींमध्येच नसताना ती आपल्यात आहे असा साक्षात्कार नानांना कसा होतो? त्यांचे अपयश सुरू होते ते इथून व त्यांच्या अडचणीत वाढ होते ती याच मुद्यापासून. पक्षाची संघटना पार खिळखिळी झालेली. नवे लोक जोडले जात नाही. त्यात सुधारणा करणे गरजेचे हे अजून त्यांच्या गावीही नाही. पक्ष संकटात आहे हेच त्यांना मान्य नाही. पक्ष म्हणजे मी व मी म्हणजे पक्ष या अहंगंडातून तयार झालेला फाजील आत्मविश्वास त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ करतोय. मध्यंतरी त्यांना काढा म्हणून पक्षाचे झाडून सारे नेते दिल्लीवारी करून आले. नाना विश्वासात घेत नाही हाच साऱ्यांच्या तक्रारीतील सूर होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा यात तथ्य आहे असे स्पष्टपणे सांगितले. मात्र शेवटी सर्वांचे बोट गेले ते राहुल गांधींकडे. आता सारे ते काय म्हणतात याकडे डोळे लावून बसलेले. हा प्रकार लक्षात येताच नानांनी सुद्धा आपले समर्थक दिल्लीत पाठवले. त्यात केवळ दोन आमदार होते. यावरून त्यांची पक्षात काय अवस्था झाली असेल हे सहज लक्षात येते. ओबीसींच्या वर्तुळात नानांच्या शब्दाला वजन आहे. ते नेतृत्व करू शकतात अशी भावना असलेला मोठा वर्ग आहे. अलीकडे त्याविषयी सुद्धा नाना काहीही बोलत नाहीत. ओबीसींच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यांना सध्या केवळ मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडू लागलीत असे पक्षात गंमतीने बोलले जाते. एकाही मोठ्या नेत्याचा पाठिंबा नसताना आपण हे पद मिळवू शकतो असा आशावाद ते कशाच्या बळावर बाळगतात हे कुणालाच समजेनासे झालेले. आक्रमकतेला चातुर्याची जोड दिली व सर्वांना विश्वासात घेऊन चालले तरच नानांच्या अडचणी कमी होऊ शकतात पण आत्मपरीक्षण करण्याची त्यांची सवय तुटलेली दिसते. पटोले व बावनकुळे हे दोघेही बहुजन समाजातून वर आलेले नेते. त्यांना लवकर पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याचे सोने करण्याऐवजी माती करण्यातच त्यांचा वेळ चालला. त्यामुळे दोघेही कमालीचे अडचणीत सापडले आहेत. परिणामी, वैदर्भीय नेत्यांना नेतृत्व करता येत नाही असा संदेश सर्व राज्यात जातोय. हे सारे दुर्दैवी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokjagar maharashtra bjp chief chandrashekhar bawankule maharashtra congress chief nana patole zws
Show comments