देवेंद्र गावंडे

सेवा, समर्पण, शिस्त, संस्कार व प्रबोधन या शब्दांना संघ परिवारात कमालीचे महत्त्व. यात सहभागी असलेल्या साऱ्या संघटना याच शब्दांचा आधार घेत समाजकारण व राजकारण करत असतात. विचारांच्या पातळीवरची कट्टरता सोडली तर परिवाराकडून दिल्या जाणाऱ्या या शिकवणुकीचे विरोधकांकडूनही कौतुक होत असते. याच परिवारातून समोर आलेल्या भाजपचा ‘पार्टी वुईथ डिफ्रन्स’चा नारा समोर आला तो यामुळेच. एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते घडवायचे असतील तर हे गरजेचे. त्यामुळे परिवारातील एखादी व्यक्ती या शब्दांशी प्रतारणा करते तेव्हा तिची चर्चा अधिक होते. मग ती व्यक्ती संघाशी संबंधित असेल तर ‘आणखी एक स्वयंसेवक नापास झाला’ अशी प्रतिक्रिया याच परिवाराकडून अगदी सहजपणे येते.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Some people in district promoted their own brothers sisters and daughters ajit pawar
नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद

या परिवाराने आज जो देशव्यापी प्रभाव निर्माण केला आहे तो हेच शब्द आचरणात आणल्यामुळे. या पार्श्वभूमीवर याच परिवारात सक्रिय असलेल्या व सध्या पोलीस कोठडीत असलेल्या मीरा फडणीस व अनिरुद्ध होशिंगने अनेकांना आर्थिक गंडा घालणे दखलपात्र ठरते. यातली गंभीर बाब म्हणजे, यात फसगत झालेले सुद्धा या परिवारातील लोक. त्यातले बरेचसे मध्यमवर्गीय. भाजपला सत्ता मिळाली या आनंदात जगणारे. या फसवणुकीच्या प्रकाराला सुरुवात झाली ती तीन वर्षांपूर्वी. अनिरुद्ध होशिंगच्या पुढाकाराने. हा मूळचा नांदेडचा. गांधी हत्येनंतर हिंसेची झळ बसल्याने जी अनेक कुटुंबे बाहेर स्थलांतरित झाली, त्यातले एक या होशिंगचे. सध्या लखनौत वास्तव्यास असलेला व अस्खलित मराठी बोलणारा हा ठकबाज माहूरच्या देवीच्या दर्शनाला नियमित यायचा. तिथेच त्याने काही स्थानिकांना केंद्रीय योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळवून देतो असे आमिष दाखवत पैसे उकळणे सुरू केले. येथेच त्याच्या संपर्कात मीरा फडणीस आल्या.त्या यवतमाळच्या व अभाविपच्या सक्रिय कार्यकर्त्या. नंतर राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून परिवारात सक्रिय असलेल्या. नंतर या दोघांनी अनेकांना ज्या पद्धतीने गंडवले त्याला तोड नाही. केंद्रीय पर्यटन खात्याचा सल्लागार आहे असे सांगत हा होशिंग नागपुरात यायचा, एका पंचतारांकित हॉटेलात मुक्काम ठोकायचा व मग हे दोघे परिवाराशी संबंधित असलेल्या अनेकांकडे जायचे व पर्यटन खात्यात तुमची वाहने भाड्याने लावून देतो म्हणून लाखो रुपये गोळा करायचे. केवळ नागपूरच नाही तर औरंगाबाद, पुणे, मुंबईतील लोकांकडून याच पद्धतीने रकमा उकळण्यात आल्या. सुमारे दीड वर्षे हा गोरखधंदा सुरू होता.

कुणाला संशय येऊ नये म्हणून या होशिंगने उत्तरप्रदेशात मोठ्या संख्येत असलेल्या मिनी बँकांचे खाते क्रमांक दिले. त्यामुळे पैसे देणारे सुद्धा निर्धास्त झाले. ही रक्कम पर्यटन खात्यात जमा केली जाईल व नंतर खात्यातर्फे वाहने दिली जातील. ती भाडेतत्त्वावर खातेच चालवेल. या स्वयंरोजगार कार्यक्रमाचा शुभारंभ मोदी व शहांच्या उपस्थितीत होईल असे सर्वांना सांगितले गेले. कुणालाही संशय येऊ नये म्हणून या दोन्ही नेत्यांची नावे असलेल्या निमंत्रण पत्रिकासुद्धा छापण्यात आल्या. आधी त्या सर्वांना वाटायच्या व नंतर कार्यक्रम रद्द झाला असे कळवून टाकायचे. ही टोलवाटोलवी कुणाच्याही लक्षात आली नाही याचे एकमेव कारण वर उल्लेखलेल्या शब्दांत दडलेले. परिवाराच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता फसवणूक करूच शकत नाही यावर पैसे देणाऱ्या साऱ्यांचा गाढा विश्वास. दीर्घकाळानंतर मिळालेल्या सत्तेचा थोडा फायदा मिळत असेल तर त्यात वावगे काय ही वृत्ती या निर्धास्तपणामागे. त्याचा फायदा घेत या दोघांनी अनेकांना जाळ्यात ओढणे सुरूच ठेवले. या काळात हा होशिंग इतक्यांदा नागपुरात आला की त्याने येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या देयकापोटी ७२ लाख रुपये खर्च केले. पैसे देऊन वर्ष लोटले तरी काहीही होत नाही म्हणून फसगत झालेल्यांनी मीरा फडणीसकडे तगादा सुरू केला तेव्हा त्यांनीही होशिंगकडे बोट दाखवले व पोलिसात तक्रार करण्यासाठी सर्वांच्या सोबत आल्या. मात्र यवतमाळमधील पीडितांनी थेट फडणीसचे नाव घेत तक्रार केली व या कार्यकर्तीचे पितळ उघडे पडले.

आता हे दोघेही तुरुंगात असले तरी तक्रार ते अटक या काळात ज्या घडामोडी घडल्या त्या परिवाराच्या सचोटीवर संशय निर्माण करणाऱ्या. तक्रार करण्याआधी फसवणूक झालेले हे पीडित आधी परिवारातील अनेकांना भेटले पण कुणीही त्यांना सहकार्य केले नाही. तक्रार झाल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून होशिंगला अटक केली. त्याने दिलेल्या जबाबात मीरा फडणीसचे नाव समोर आले. त्याच या प्रकरणाच्या सूत्रधार आहेत हे त्याचे म्हणणे रेकार्डवर येऊन सुद्धा पोलिसांनी त्यांना साधे चौकशीसाठी बोलावले नाही. या काळात एकीकडे त्या जामिनासाठी प्रयत्न करत होत्या तर दुसरीकडे त्यांना अटक करू नये यासाठी परिवारातील काही बडे लोक सक्रिय झाले होते. यात पुढाकार होता तो अमरावती विद्यापीठात बडे पद भूषवून नागपूरला परतलेल्या एका मान्यवराच्या पत्नीचा. त्याला साथ होती ती अमरावतीच्याच एका लोकप्रतिनिधीची. हा प्रतिनिधी कोणत्या पक्षाचा हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सत्तेच्या वर्तुळात मोठा दबदबा असलेल्या या राजकारण्याने आरोपीला मदत केली व पीडितांना हे उघड्या डोळ्याने बघावे लागले. आपल्याच लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला वाचवणे हे कोणत्या नैतिकतेत बसते हे या नेत्यालाच ठाऊक. अटकेत असलेला आरोपी लखनौचा पण फडणीसला अटक झाली तर राज्यभरात जास्त बदनामी होईल ही भीती कदाचित या मदतीमागे असेल. मग फसवणूक झालेल्यांचे काय? तेही तर सारे परिवारातील सदस्य होते व आहेत. पीडितांकडून दबाव वाढू लागल्यावर यवतमाळ पोलिसांनी फडणीस यांना अटक केली. आता नागपूर पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून कदाचित सत्य बाहेर येईलही पण बुडालेल्या कोट्यवधी रुपयांचे काय? पीडितांचा घामाचा पैसा परत मिळणार कसा? होशिंगला लखनौवरून पकडून आणल्यानंतर त्याने गोळा केलेले कोट्यवधी रुपये नेमके कुठे आहेत याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा होता. त्यादृष्टीने प्रयत्नच झाले नाहीत. त्याला पकडायला गेलेले पोलीस त्याच्याच बीएमडब्ल्यू कारमधून त्याला सोबत घेत नागपूरला परत आले. या प्रवासात नेमके काय शिजले? गेल्या काही महिन्यांपासून हा आरोपी नागपूरच्या तुरुंगात आहे. या काळात फडणीसची चौकशी झाली असती तर बऱ्याच गोष्टी समोर आल्या असत्या. मुख्य म्हणजे पैशाचा शोध लागू शकला असता. त्याकडे पोलिसांनी लक्ष का दिले नाही? ही चौकशी होऊ नये यासाठी कुणाचा दबाव होता? हे प्रश्न आता अनुत्तरित राहण्याची शक्यता जास्त. मात्र या निमित्ताने सत्ता हे सेवेचे साधन आहे असे वाक्य वारंवार वापरणाऱ्या व सत्तेचा मोह कुणाला नाही असे उच्चरवात नेहमी सांगणाऱ्या या परिवाराचा चेहरा उघडा पडला आहे. सत्तेचा मोह भल्याभल्या नीतिवानांना सुद्धा आवरत नाही हेच खरे!

devendra.gawande@expressindia.com