देवेंद्र गावंडे
आता तुम्ही म्हणाल रस्त्यावरचा एक लहानसा फुटकळसदृश्य दिसणारा खड्डा ही काय या स्तंभातून दखल घेण्याजोगी गोष्ट आहे? असे अनेक खड्डे विविध शहरात ठिकठिकाणी असतातच, त्याला वळसा घालून पुढे जाण्याची ‘योग्य’ सवय नागरिकांनी स्वत:ला लावून घेतलेली. होतात असे खड्डे, त्यात काय एवढे अशी समजूत प्रत्येकाने करून घेतलेली. मग त्याची दखल घेण्याचे कारण काय? अनेकांच्या दृष्टीने असले प्रश्न रास्त असू शकतात. सत्तेच्या भक्तीत रममाण होणाऱ्यांना तर अलीकडे ते पडतच नाहीत. इतरांना पडले व त्यांनी ते चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला की हा भक्तसंप्रदाय टोळधाड घालण्यासाठी तयारच असतो. म्हणून मग नसती झेंगट कशाला म्हणत अनेकजण असले ‘फालतू’चे विषय टाळतात. मात्र आता या स्तंभासाठी निवडलेला खड्डा तसा टाळता येण्याजोगा नाही. या खड्ड्याचे वय आहे अंदाजे तीन वर्षे. तो आहे रविनगर चौकातल्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी. एका मोक्याच्या वळणावर. या ठिकाणी असलेला पूल खचला व तो तयार झाला. अगदी भलामोठा. इतका की तिथला वळणरस्ता त्यामुळे बंद झाला. परिणामी या चौकातील वाहतूककोंडी वाढली. अनेकांना त्याचा त्रास व्हायला लागला. यापायी वाहनधारक हा चौक टाळू लागले. चौकात असलेल्या शेकडो दुकानदारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अजूनही करावा लागतो. पण कुणीही तोंडातून साधा ‘ब्र’ सुद्धा काढला नाही. कारण एकच. याच भागात नाही तर संपूर्ण शहरात राहणाऱ्या नागरिकांचे लोकप्रिय खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कमालीचे प्रेम. या प्रेमापोटीच या साऱ्यांनी हा खड्डा गोड मानून घेतला. ज्या सजग नागरिकांना याचा त्रास रोज सहन करावा लागला त्यांनी हा खड्डा म्हणजे अमृतकाळातले प्रतीक अशी समजूत करून घेतली. आता तुम्ही म्हणाल की या चिल्लर खड्ड्याचा थेट गडकरींशी काय संबंध? उगाच त्यांच्यासारख्या कार्यतत्पर नेत्याला बदनाम का करता? एवढा मोठा माणूस या लहानशा खड्ड्याकडे लक्ष देणार काय? हे तर अधिकाऱ्यांचे काम, त्यात मंत्र्यांना कशाला आणता? वरवर बघता कुणालाही हे प्रश्न रास्त वाटू शकतात. मात्र वास्तव तसे नाही. तर हा खड्डा येतो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित. त्यामुळे पूल जेव्हा खचला तेव्हा स्थानिक पालिकेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी आले, त्यांनी पाहणी केली व हे काम आपल्या कार्यकक्षेत येत नाही या समाधानात परत गेले. मग उरले प्राधिकरण. त्यांच्या कामाचा व्याप मोठा. रोज हजारो कोटीच्या नवीन योजना जाहीर करून गडकरी जसे सामान्यांना दिपवून टाकतात तसे या प्राधिकरणातले लोकही दिपून गेलेले. या भारावलेल्या अवस्थेत कोट्यवधीच्या कामाकडे लक्ष द्यायचे की असल्या क्षुल्लक खड्ड्याकडे असा प्रश्न या अधिकाऱ्यांना पडला व सुमारे दोन वर्षे हा खड्डा विकसित नागपूरचे वास्तव दाखवत राहिला.
हा रविनगर चौक ज्या अमरावती मार्गावर आहे तोच सिमेंटचा करायचाय, शिवाय वरून उड्डाणपूल होणारच, मग कशाला या खड्ड्याकडे लक्ष द्यायचे असा प्रामाणिक विचार प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला असावा. त्यात दोन वर्षे निघून गेली. या काळात या खड्ड्यात काहीजण पडले, कुणाचे वाहन फसले पण कुणीही त्रागा केला नाही. विकासकामे पूर्ण होतानाचा काळ प्रसववेदनेसारखा असतो असे मनाला बजावत सारेच गप्प राहिले. त्यामुळे हा खड्डा जसा होता तसाच राहिला. त्यात असलेल्या मलब्यावर जळमटे चढली. खाली असलेल्या वाहिन्या, संचार यंत्रणांच्या तारांचे कडबोळे धूळ साचल्याने भूताटकीसारखे दिसू लागले. त्यालाही कुणी भ्याले नाही. काही नतद्रष्टांनी या खड्ड्यात कुठे विकास दडलेला दिसतो का याचा शोध घेतला पण त्यांनाही ‘नाही दिसला’ असे म्हणायची हिंमत झाली नाही. या काळात ‘दूरदृष्टी’ असणारे अनेक नेते या चौकातून कित्येकदा गेले पण हा क्षुद्र खड्डा त्यांच्या नजरेस पडला नसावा. जेव्हा पुलाचे, रस्त्याचे काम होईल तेव्हा हा खचलेला पूल उभारून टाकू परिणामी खड्डा नामशेष होईल असे प्राधिकरणाने मनाशी ठरवून टाकले. जाहीर मात्र केले नाही. खड्ड्यामुळे वळण घेणारा रस्ता बंदच झाला आहे तर त्याच्या बाजूला असलेला व चौकात मोठा अडसर ठरणारा वीज कंपनीचा ट्रान्सफार्मर दुसरीकडे हलवून चौक मोठा करू असे या महावितरणच्या डोक्यात आले नाही. कदाचित नेते सांगतील तेवढेच करायचे अशी सवय मेंदूला लावून घेतल्याचा हा परिणाम असावा. त्यामुळे हे ट्रान्सफार्मर आहे तिथेच राहिले. दुसरीकडे आपल्या नेतृत्वात जनता समाधानी आहे या आनंदात नेते मग्न राहिले. मग अचानक एक दिवस प्राधिकरणाला बुद्धी सुचली व त्यांनी या पुलावर नव्याने स्लॅब टाकण्याचे काम हाती घेतले. चला, आता एकदाचा हा वळणरस्ता सुरू होणार, त्रासातून मुक्तता होणार म्हणून अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला पण तोही गुप्त पद्धतीने. भक्तांच्या लक्षात सुस्काऱ्याचा आवाज येणार नाही अशी काळजी घेत. काम सुरू झाल्यावर कुठून कळ फिरली कुणास ठाऊक पण अर्धा स्लॅब होताच काम बंद झाले. वळणरस्ता सुरू झाला पण अर्धाच. उर्वरित खड्डा तसाच राहिला. विकसित नागपूरची साक्ष पटवत. आता या खड्ड्याचा आकार तुलनेने कमी झालाय. त्यात कुणी पडेल हा धोकाही जवळजवळ टळलाय पण त्याचे दिसणे कायम. त्याला बघितल्यावर अनेकांच्या मनात काहीबाही विचार येत असतील. हा कसला विकास? एक खड्डा दुरुस्त व्हायला तीन वर्षे कशी लागतात? याला गतिमान विकास कसे म्हणायचे? असले प्रश्न पडत असतील पण कुणीही ते विचारण्याचे धाडस करत नाही. कशाला उगीच भक्तांच्या रडारवर यायचे अशी मनाची समजूत घालत सारे शांत आहेत. या खड्ड्यामुळे सर्वाधिक त्रास सहन करणारे वाहनधारक बहुतांशी मध्यमवर्गीय. ते तर या सरकारच्या दृश्य विकासाच्या प्रेमात आकंठ बुडालेले. गेल्या नऊ वर्षात या साऱ्यांना प्रत्येक अडचण गोड मानून घेण्याची सवय जडलेली. आधी देश महत्त्वाचा, धर्माचे रक्षण महत्त्वाचे. हे खड्डे काय आज आहेत, उद्या राहणार नाहीत. मग कशाला उगीच त्यावरून कंठशोष करायचा असा साळसूद विचार मनात आणून सारे शांतपणे जगणारे. याच काळात नेत्यांच्या लोकप्रियतेची उंची एवढी वाढली की त्यांना या क्षुल्लक गोष्टीवरून बोल लावण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. त्यामुळे खड्डे निर्मूलनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणाही बऱ्यापैकी सुस्तावलेल्या. विकासाची घोडदौड एवढी वेगात सुरू असताना पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे उगवणाऱ्या याच काय अनेक ठिकाणच्या खड्ड्यावर लक्ष देण्याची गरज कुणाला वाटत नाही. हेच खरे राष्ट्रप्रेम व हा खड्डा त्याचे प्रतीक.
devendra.gawande@expressindia.com