विश्वासार्हता संपली की सामान्य जनता कशी पाठ फिरवते याचे उत्तम उदाहरण म्हणून राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याकडे पाहायला हवे. मोठा गाजावाजा करून ते आले. तेही त्यांना आवडणारा रेल्वेचा प्रवास करून. सलग पाच ते सहा दिवस ते फिरले. गोंदियापासून बुलढाण्यापर्यंत. या संपूर्ण काळात त्यांनी केवळ एक जाहीर सभा घेण्याचे धाडस केले. तेही यवतमाळातील वणीत. तिथे राजू उंबरकर सारखा जनसामान्यात लोकप्रिय असलेला नेता पक्षात आहे म्हणून. अन्य ठिकाणी केवळ पदाधिकाऱ्यांच्या बैठका व त्यात खास ठाकरे शैलीत दिलेल्या कानपिचक्या एवढेच त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप राहिले. ही अशी अवस्था मनसेवर का ओढवली याचा विचार करण्याआधी जरा इतिहासात डोकवायला हवे. ठाकरेंनी जेव्हा शिवसेनेशी फारकत घेत पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी केलेला विदर्भ दौरा आठवा. त्यांच्या ठिकठिकाणच्या सभांनी तेव्हा गर्दीचे सारे उच्चांक मोडलेले. मराठी माणसांवर, तरुणांवर होणारा अन्याय ही त्यांची सुरुवात होती. हा माणूस जे बोलतो त्यात सच्चेपणा आहे, तरुणांविषयी कळकळ आहे. त्यांच्यासाठी काही तरी करण्याची इच्छाशक्ती आहे या भावनेतून तरुणांच्या झुंडी त्यांच्या पाठीशी उभ्या ठाकल्या. भलेही तेव्हा त्यांना विदर्भात यश मिळाले नसेल पण शिवसेना तसेच इतर प्रस्थापित पक्षांना कंटाळलेला एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला. त्याचा अचूक फायदा त्यांना घेता आला नाही. याची कारणे दोन. त्यातले पहिले विदर्भातील पक्षाचे दैनंदिन कामकाज मुंबईतून नियंत्रित करण्याची वृत्ती. जी चूक शिवसेनेने केली तीच यांनी केली.
याला आणखी एक जोडकारण आहे. ते म्हणजे विदर्भाचे प्रश्न, अस्मिता समजून न घेणे. भलेही हे राज्य एक असले तरी प्रत्येक प्रदेशाचे प्रश्न भिन्न. दौरा करताना त्याला हात घालावा लागतो. तरच तो पक्ष तेथील जनतेला जवळचा वाटू लागतो. राज ठाकरे या भानगडीत कधी पडलेच नाहीत. विदर्भाचे मागासपण, अनुशेष, प्रदूषण, उद्योग यासारख्या प्रश्नांना त्यांनी हात घातला नाही. वा अभ्यासपूर्ण बोलले नाहीत. एखाद्या दूरच्या प्रदेशातील प्रश्नांचे आकलन होत नसेल तर दौऱ्याच्या वेळी स्थानिक अभ्यासकांच्या गाठीभेटी घेणे, त्यांच्याकडून मुद्दे समजून घेणे हे सर्वच नेते करतात. ठाकरेंना याचीही गरज कधी वाटली नाही. याही दौऱ्यात ते विदर्भातील प्रश्नांवर चकार शब्द बोलले नाहीत. त्यामुळे त्यांचा पक्ष वैदर्भीयांना जवळचा म्हणून कधी वाटलाच नाही. एकच मुद्दा ते कायम हाताळत आले, तो म्हणजे स्वतंत्र विदर्भाचा. यावर ते कायम आक्रमकपणे बोलत राहिले. वैदर्भीयांची मानसिकता काय याचा विचार न करता. त्यामुळे पक्षविस्तारासाठी हा मुद्दा सुद्धा त्यांना येथे कायम अडचणीचा ठरत गेला. विदर्भाच्या कोणत्याही प्रश्नांना वाचा फोडायची नाही या त्यांच्या भूमिकेमुळे या भागातील मनसैनिकांसमोर करायचे काय असा प्रश्न कायम उभा राहिला. पक्षाने काहीच दिशा दिली नाही. धोरणही नाही अशा स्थितीत मनाला पटेल ते करायचे अशी भूमिका हे सैनिक घेत राहिले व यातून या साऱ्यांनी जवळ केले ते ‘खळखट्याक’ या कृतीला. हे करणे तुलनेने सोपे होते. तोच मार्ग साऱ्यांनी पत्करला. पक्षाचे धोरण संपूर्ण राज्याचा विचार करणारे हवे. तरच सर्व भागात विस्ताराचा कार्यक्रम राबवता येतो हे ठाकरेंच्या लक्षात आले नसेल का? असा प्रश्न पडण्याची कुवत नसलेले व वैचारिक बैठकीपासून कोसो दूर असलेले मनसैनिक मग वाटेल ते करू लागले व यातून जन्माला आली ती खंडणीखोरी. आजही या पक्षात काही मोजके अपवाद सोडले तर सारेच या वाटेने जाताना दिसतात. हे अध:पतन ठाकरेंना दिसत नसेल काय? ज्याला कुठेच थारा मिळत नाही व राजकारणात राहून केवळ कमाई करायची असेच लोक आज या पक्षात जाताना दिसतात. हे चित्र बदलण्याचा प्रयत्न ठाकरेंनी कधीच केला नाही.
यातले दुसरे कारण आहे ते त्यांच्या राजकीय पातळीवरील धरसोडीच्या भूमिकेशी निगडित. मोदी सत्तेत आल्यावर ते गुजरातला जाऊन आले व त्यांचे समर्थक म्हणून दीर्घकाळ वावरले. तेव्हा त्यांना तेथील विकासाने जणू भुरळ घातली होती. नंतरच्या निवणुकीत ते कट्टर मोदी विरोधक म्हणून उदयाला आले. अजूनही अनेकांच्या स्मरणात असलेला ‘लाव रे तो व्हिडीओ’चा कार्यकाळ हाच. त्यांच्या सभाही गाजल्या. त्यात त्यांनी मेळघाटमधील गावांचा केलेला उल्लेखही चर्चिला गेला. या दुर्गम भागातील हरीसाल नावाचे गाव डिजीटलयुक्त असल्याचा सरकारचा दावा कसा फोल आहे हे दाखवून देत त्यांनी सत्तारूढ पक्षांची पंचाईत करून टाकली. गेल्या निवडणुकीत ते पुन्हा नव्वद अंशाच्या कोनातून वळले व लोकसभेसाठी मोदींचे प्रचारकर्ते झाले. हा पाठिंबा फक्त लोकसभेसाठी असे ते सतत सांगत राहिले. त्यांनी प्रत्येकवेळी घेतलेेले हे नवे वळण जनतेला रुचले नाहीच शिवाय त्यांनी प्रत्येकवेळी जी भूमिका घेतली त्याच्या विरोधात जनतेने कौल दिला. आता ते पुन्हा मूळ पदावर येत विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या गोष्टी करू लागलेत. त्यांचा आताचा दौरा त्यासाठीच होता. आता मुद्दा असा की अल्पकाळात इतकी वळणे घेत भूमिका बदलल्यावरही लोकांनी त्यांच्यावर का म्हणून विश्वास टाकावा? मूळचे कलावंत असलेले राज ठाकरे लोकांना गृहीत कसे काय धरू शकतात? त्यांची वाटचाल आता प्रकाश आंबेडकरांच्या दिशेने सुरू झाली असे समजायचे काय?
आंबेडकर थेट कळपात न जाता अप्रत्यक्षपणे धर्मनिरपेक्षतेच्या विचारात फूट कशी पडेल या दृष्टीने राजकारणातील डावपेच लढवतात. ठाकरे थेट पाठिंबा किंवा विरोध दर्शवतात हाच काय तो दोघांमधला फरक पण विश्वासार्हता गमावण्याच्या मुद्यावर दोघेही समान पातळीवर आलेले हे मात्र नक्की. विदर्भात आधीच मनसेची ताकद कमी, त्यात ठाकरे नेमके कुणाचे हा प्रश्न सामान्यांना पडलेला. अशा संभ्रमावस्थेत या पक्षाला थोडेही यश मिळणे दुरापास्त. यावेळी सर्व जागांवर निवडणूक लढवू असे ठाकरेंनी नागपुरात जाहीर केले पण त्यांच्यावर भरवसा कोण आणि कसा ठेवणार? आताही महायुतीचे नेते ठाकरे सोबत येतील अशी सूचक विधाने करतात. यावरून निर्माण झालेला संशय दूर करण्याचे प्रयत्न सुद्धा ठाकरेंकडून होताना दिसत नाही. उलट या दौऱ्यात त्यांनी जिथेतिथे महाविकास आघाडीला यश मिळाले तिथेच उमेदवार घोषित केले. चंद्रपूर, वणी ही त्यातली ठळक उदाहरणे. यावरून त्यांची नेमकी भूमिका काय? त्यांना स्वतंत्र लढायचे की तिसरी आघाडी असे दर्शवून महायुतीला मदत करायची आहे? हे दोन मोठे प्रश्न मागे सोडून ठाकरे मुंबईला परतलेत. विश्वासार्हता व हेतूविषयी संशय निर्माण झाला की पक्षाची कशी वाताहत होते याचे उत्तम उदाहरण म्हणून मनसेकडे बघता येईल. किमान विदर्भापुरते तरी!
devendra.gawande@expressindia.com