गटबाजी हा काँग्रेसला जडलेला असाध्य आजार आहे. अगदी कर्करोगासारखा. तो जसा उपचारानंतर बरा झाल्यासारखा वाटतो व नंतर पुन्हा उफाळून येतो तसा. हा पक्ष जेव्हा सतत पराभव स्वीकारत असतो तेव्हा गटबाजी दिसून येत नाही. एकदा का विजय मिळवणे सुरू झाले की पक्षातील नेत्यांना गटतटाचे राजकारण करण्यासाठी जणू ऊर्जाच प्राप्त होते. यातून अनेकदा विजयाचा घास हिरावला जातो पण त्याचे कुणाला सोयरसुतक नसते. स्वत:चा, पक्षाचा पराभव झाला तरी बेहत्तर पण समोरच्या स्वपक्षीयाला त्याची जागा दाखवणारच असा पण यात रमणारा प्रत्येकजण करत असतो. हेच नेते जेव्हा भाजपसारख्या तुलनेने शिस्तबद्ध पक्षात जातात तेव्हा गटबाजी विसरतात व सूतासारखे सरळ वागायला लागतात. समजा परत पक्षात आले की त्यांचा मूळ स्वभाव उफाळून येतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. अर्थात ती द्यायची गरजच भासणार नाही इतके ताजे उदाहरण सध्या चर्चेत आहे.

या पक्षाच्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकरांनी नुकतेच त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन म्हणजे ब्रम्हपुरीत एक विधान केले. तेथील आमदार व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा पराभव करा. त्यांनी थेट नाव घेतले नाही पण विद्यमान आमदार असा सूचक उल्लेख केला. यानंतर या दोघांमधील वाद रंगणार असे वाटत होते पण वडेट्टीवारांनी बोलणे टाळले. अखेर पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही दिल्लीला बोलावून घेतले व जी काय समज द्यायची ती दिली असे म्हणतात. लोकसभेत भरपूर मताधिक्यांनी विजयी झाल्यापासून धानोरकर सध्या जोमात आहेत. हे साहजिकच. मात्र जातीय प्रचाराच्या बळावर मिळवलेल्या या विजयाचा वापर जनतेच्या कल्याण्यासाठी करावा असे त्यांना अजूनतरी वाटल्याचे दिसले नाही. तशी आमदार म्हणूनही त्यांची कामगिरी शून्य होती. वरोरा-भद्रावती मतदारसंघातील एखादी मोठी समस्या त्यांनी सोडवली असे गेल्या पाच वर्षात कधी दिसले नाही. एवढेच काय त्यांचे दिवंगत पती बाळा धानोरकर यांनीही चंद्रपूरच्या विकासासाठी काहीही केल्याचे कुणाला स्मरत नाही. जनतेला भेटता यावे म्हणून ठिकठिकाणी घरे बांधणे हीच कामगिरी यांच्या नावावर. तरीही त्या भरघोस मतांनी निवडून आल्या व विकासाची दृष्टी असलेल्या मुनगंटीवारांचा त्यांनी पराभव केला. जनतेचा कौल शिरसावंद्य म्हणून त्यावर भाष्य करणे योग्य नाही पण सुमार कामगिरी अशीच ओळख असलेल्या धानोरकरांचा राग वडेट्टीवारांवर आहे तो त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे. उमेदवारी मागताना वाद होणे यात गैर काही नाही पण त्यानंतर ते विसरायला हवे. नेमके हेच काँग्रेसमध्ये कधी घडत नाही. म्हणून जातीच्या मेळाव्यात त्या वडेट्टीवारांवर घसरल्या, तेही भाजप आमदाराच्या साक्षीने.

याच धानोरकरांच्या यजमानांना गेल्यावेळी उमेदवारी मिळवून देण्यात वडेट्टीवारांची भूमिका मोठी होती. एका क्षणी तर त्यांची ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था झालेली पण वडेट्टीवारांच्या आग्रहामुळे व त्यांनीच केलेल्या प्रचारामुळे ते २०१९ ला निवडून आले. विद्यमान खासदार गटबाजीच्या नादात हा अलीकडचा इतिहास पार विसरल्या. मधल्या पाच वर्षात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. धानोरकर व वडेट्टीवारांमध्ये वाद रंगले हे बरोबर. पण राजकारण करताना अनेक गोष्टी विसराव्या लागतात. ते प्रतिभा धानोरकरांना मान्य नाही असे दिसते. मध्यंतरी तर यजमानांचा मृत्यू वडेट्टीवारांमुळे झाला असे म्हणण्याइतपत त्यांची मजल गेली होती. हे साफ खोटे होते. बाळा धानोरकर आज जिवंत असते तर ते कोणत्या पक्षात राहिले असते याचे उत्तर साऱ्यांना ठाऊक आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून कार्यक्षमतेचा विचार केला तर धानोरकरांपेक्षा वडेट्टीवार कितीतरी पटीने उजवे ठरतात. ब्रम्हपुरीवर त्यांची चांगली पकड आहे. केवळ त्यांच्याकडे जात नाही म्हणून पाडा व बहुसंख्य म्हणजे कुणबी जातीचा उमेदवार निवडून द्या असे म्हणणे जातीचा दुराभिमान बाळगण्यासारखेच. निवडणुकीत जात हा घटक महत्त्वाचा असतो. सर्वच पक्ष त्याचा विचार करतात पण या एकाच कारणाने वारंवार विजय मिळवता येत नाही हे धानोरकरांना कुणीतरी समजावून सांगायला हवे. केवळ जात हा घटक डोळ्यासमोर ठेवून जो राजकारण करतो तो कार्यक्षम लोकप्रतिनिधी होऊच शकत नाही. इतिहासात याची कितीतरी उदाहरणे आढळतील. धानोरकरांच्या बाबतीत तेच घडण्याचा धोका जास्त.

निवडून आल्यापासून त्या ठिकठिकाणी सत्कार घेत फिरत आहेत. यात गैर काही नाही पण प्रत्येक ठिकाणी त्या विधानसभेतील उमेदवार मीच ठरवणार असेही सांगत आहेत. यश कितीही मोठे असो ते मिळाले की पाय जमिनीवर राहील याची खबरदारी राजकारण्यांना घ्यावी लागते. त्यांच्यात नेमका त्याचाच अभाव दिसतो. ही धोक्याची घंटा आहे हे त्यांच्या गावीही नाही. वडेट्टीवारांविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी त्यांना पक्षातील नेमकी कुणाची फूस आहे हेही सर्वांना ठाऊक. ज्या ब्रम्हपुरीच्या कार्यक्रमातून त्यांनी गर्जना केली तो गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ब्राम्हणवाडेंनी आयोजित केला होता. ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे कट्टर समर्थक. पटोलेंना खूप आधीपासून मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. या स्वप्नपूर्तीच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. त्यातला विदर्भातील अडथळा म्हणजे विजय वडेट्टीवार. ते पक्षात नानांपेक्षा ज्येष्ठ आहेत. शिवाय त्यांनी गेल्या अडीच वर्षात विरोधी बाकावरून सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. शेवटच्या अधिवेशनात तर त्यांनी अदानीवरून सत्ताधाऱ्यांना अक्षरश: घाम फोडला. खुद्द राहुल गांधींनी त्यांचे कौतुक केले. त्या तुलनेत नानांची सरकारवर टीकेची झोड बरीच कमी झालेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ते अजिबात टीका करत नाहीत. यामागची कारणे मुंबई महापालिकेत दडली आहेत असे गंमतीने बोलले जाते. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर पक्षातील प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढायचा याच उद्देशाने हा ब्रम्हपुरीचा बनाव रचला गेला असण्याची दाट शक्यता आहे. याचाच अर्थ धानोरकरांना पटोलेंचे पाठबळ आहे. नानांनी लोकसभेत जातीच्या राजकारणाला महत्त्व दिले. त्याचा फायदा पक्षाला झाला. तेच धोरण ते विधानसभेत अंगीकारणार असतील तर पक्षाच्या सर्वसमावेशक भूमिकेचे काय? सर्व जाती धर्मांना सामावून घेणारा पक्ष अशीच काँग्रेसची ओळख आहे. ती पुसून टाकण्याचा विडा पटोले व धानोरकरांनी उचलला आहे काय? आजच्या घडीला पक्षातील सर्व मोठे नेते विरुद्ध पटोले असे चित्र आहे. या स्थितीतही ते मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहात असतील व त्यासाठी त्यांना वडेट्टीवारांचा काटा काढायचा असेल तर अनुकूल वातावरणातही पक्ष कसा खड्ड्यात टाकायचा हे त्यांच्याकडूनच शिकावे असे खेदाने म्हणावे लागते. गटबाजीशिवाय हा पक्ष जिवंतच राहू शकत नाही असे आधी बोलले जायचे. आता तसे दिवस राहिले नाही हे नाना व धानोरकरांना कोण समजावून सांगणार? शेवटी काँग्रेसचा वैरी काँग्रेस हेच खरे!