गडचिरोली : भामरागड येथे क्षयरोगामुळे मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेअभावी दुचाकीला खाट बांधून नेण्यात आला. ‘लोकसत्ता’ने याविषयीचे वृत्त प्रकाशित करताच राज्यात खळबळ उडाली. बुधवारी विधानसभेतदेखील आमदार विजय वडेट्टीवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून याविषयी प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा… तलाठी भरतीत ‘सेटींग’ होईल का? उमेदवारांकडून विचारणा; १९ लाखांचा दर अन्…
२० जुलै रोजी भामरागड तालुक्यातील कृष्णार येथील रहिवासी असलेला गणेश तेलामी या २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी युवकाचा हेमलकसा येथे मृत्यू झाला. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी मृतदेह दुचाकीला खाट बांधून नेला. याविषयीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित करताच पाच दिवसांनंतर खळबळून जागे झालेल्या आरोग्य विभागाने कृष्णार येथे चमू पाठवून मृत युवकाच्या कुटुंबीयांची भेट घेत विचारपूस केली. दरम्यान, बुधवारी आमदार विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून त्या भागात खनिज निधीतून शववाहिका उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. समाजमाध्यमावर तरुणाचा मृतदेह दुचाकीला खाट बांधून नेत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.