कथा, कादंबरी, कविता असे सर्व विषय एकाच अंकात हाताळण्यापेक्षा एका विशिष्ट विषयावर सखोल, पण मन प्रफुल्लित करणारा अंक देण्याची परंपरा ‘लोकसत्ता’च्या ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाने जोपासली आहे. अशाच एका वेगळ्या विषयाला वाहिलेल्या ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन बालरोगतज्ज्ञ व लेखक डॉ. श्रीकांत चोरघडे व विठोबा इंडस्ट्रीजचे संचालक कार्तिक शेंडे यांच्या हस्ते आज शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयात करण्यात आले.
लोकसत्ताशी अगदी जुना संबंध आहे आणि गेल्या ३० वर्षांपासूनचा वाचकही आहे. त्यामुळे वृत्तपत्र असो की दिवाळी अंक, त्याचा दर्जा उच्च राहणारच, असे डॉ. श्रीकात चोरघडे म्हणाले. लहानपणी व्यक्ती कशी असते, तिला काय व्हायचे असते आणि नंतर ती काय होते, हे सांगताना डॉ. श्रीकांत चोरघडे यांनी लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येकाने एखादा छंद जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले. लोकसत्तातील लेखनाचा मी चाहता आहे. ‘पूर्णब्रम्ह’ हे पुस्तक मी आवर्जून घरी घेऊन जातो आणि त्यातील पदार्थ करून पाहतो. एक विशिष्ट विषय घेऊन अंक हाताळावा, ही संकल्पना नाविन्यपूर्ण आहे, असे कार्तिक शेंडे म्हणाले. प्रास्ताविकातून लोकसत्ताचे उपनिवासी संपादक देवेंद्र गावंडे म्हणाले, विशिष्ट विषयाला वाहिलेला अंक असावा हे आम्ही गेल्या काही वर्षांपासून कटाक्षाने पाळतो आहे. या क्रमात यापूर्वीही अनेक चांगले विषय हाताळले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी करण्याचे राहून जाते आणि यावर्षी आम्ही तेच वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले.
ऐन निवडणुकीच्या धावपळीतही लोकसत्ताच्या संपादकीय आणि जाहिरात विभागाने इतका दर्जेदार अंक काढला, असे कौतुक लोकसत्ताच्या वितरण विभागाचे उप-महाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे यांनी केले. लोकसत्ताचे खास प्रतिनिधी राम भाकरे यांनी संचालन केले. दिवाळी अंकाच्या प्रकाशनाला जाहिरात विभागाचे मुख्य व्यवस्थापक विजय संत यांच्यासह लोकसत्ताच्या संपादकीय, जाहिरात, वितरण तसेच सर्व विभागातील सहकारी उपस्थित होते.