बुलढाणा : लोणार पोलिसांनी परिश्रम पूर्वक आणि चिकाटीने लोणार मधील नकली नोटा रॅकेट उध्वस्त केले आहे. काटेकोर गुप्तता पाळून ही कारवाई करण्यात आली असून आज ४ एप्रिल अखेर पाच आरोपीना अटक करण्यात आली असून फरार आरोपीचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे.
मागील मार्च महिण्यापासून लोणार पोलिसांनी घटनेचा तपास केला आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बि बि महामुनी, मेहकरचे उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात लोणार पोलीस ठाण्याचे ठाणेदार निमिष मेहेत्रे आणि त्यांच्या चमुने हा तपास केला आहे. मागील २५ मार्च रोजी लोणार पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली होती.
लोणार शहरातील एक व्यक्ति १०० आणि ५०० च्या नकली नोटा बाजारात व्यवहार करुन चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून ठाणेदार निमिष मेहेत्रे याच्या मार्गदर्शनात लोणार मधील हिरडव चौक पारिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी यावेळी त्या व्यक्तीला पंचा समक्ष १०० च्या सात नकली नोटासह ताब्यात घेण्यात आले.चौकशीत यां व्यक्तीचे नाव मोईन खां असल्याचे आणि लोणार मधील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
असा लागला छडा
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक इंगोले यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १७९, १८० नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक धनंजय इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला. दरम्यान त्याच्याकडुन आणि गोपनीय सूत्राकडून प्राप्त माहिती वरून पोलिसांनी आणखी चार आरोपीना अटक केली.
यामध्ये मोहंमद अतिक मोहमद लुकमान ( ४१ वर्षे,नवीनगरी लोणार ), शेख लुकमान शेख कालू, वय ५६, आझाद नगर लोणार ), सैयद मुजाहिद आली, सैयद मुमताज अली, वय २३, रोशन पुरा,लोणार) आणि अब्दुल रहीम अब्दुल रशीद, वय ३५, सुलतानपूर, तालुका लोणार)यांचा समावेश आहे. त्यांची पोलीस कोठडी घेऊन कसून चौकशी करण्यात आली. यां टोळीकडून शंभर च्या १९ नकली नोटा आणि दुसऱ्या ‘पार्टी’ कडून मिळालेले दहा हजार रुपये कमिशन असा मुद्धेमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या भीतीने त्यांनी मोठ्या संख्येतील नकली नोटा जाळून नष्ट केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
सूत्रधार कोण?
दरम्यान यां घटनेतील अन्य आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच नकली नोटा छापणारा आणि त्या बाजारात चलनात आणणारा सूत्रधार कोण? याचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत. त्यामुळे प्रकरणतील आरोपीची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. ही कारवाई ठाणेदार मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी इंगोले, धनंजय इंगळे,कर्मचारी खराडे, चव्हाणं, जाधव, लोढे, धोंडगे, शेळके, शिंदे यांनी बजावली.