नागपूर : जगप्रसिद्ध लोणार सरोवराला येत्या काळात जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्यावतीने यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली गेली. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान ही माहिती न्यायालयापुढे सादर करण्यात आली. दोन आठवड्यांत पुरातत्व विभागाला याबाबत सविस्तर अहवाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
लोणार सरोवराच्या संवर्धनाबाबत न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयीन मित्र ॲड. एस.एस. सन्याल यांनी लोणार सरोवराला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाची योजना असल्याचे सांगितले. २०२० या वर्षात लोणार सरोवरला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा दिला गेला होता. लोणार सरोवर आणि परिसराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यावर त्याचे संवर्धन करणे अधिक सुलभ होईल.
हेही वाचा – VIDEO : तीन महिन्यांच्या बछड्यांसह वाघिणीचा ‘रॅम्प वॉक’, एकदा बघाच….
सरोवर परिसरात १५ मंदिरे पुरातन असून त्यांचेही संवर्धन करणे गरजेचे आहे, अशी माहिती न्यायालयाला दिली गेली. दुसरीकडे, सरोवराच्या संवर्धनासाठी विविध विभाग कार्यरत असल्याने त्यांच्यात समन्वय साधण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. मागील सुनावणीत सरोवराच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्यासाठी अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीद्वारा करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली होती. प्रकरणावर पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.