वाशिम : जिल्ह्यातील जय गजानन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. येथील वजन काट्यात तफावत असल्याची तक्रार हिवरा रोहिला येथील शेतकऱ्यांनी केली होती. त्यावरुन वैधमान अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य आढळले. वैधमान अधिकाऱ्यांनी तो वजनकाटा सील केला आहे.
वाशिम तालुक्यातील हिवरा रोहिला येथील शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करण्यासाठी वाशीम बाजार समितीच्या धरम काट्यावर नेला असता तेथे पूर्ण गाडीचे वजन ३२ किंटल २५ किलो भरले. तेथून शेतमाल विक्री करण्यासाठी जय गजानन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वजन काट्यावर पूर्ण गाडीचे वजन केले असता ३१ किंटल ७५ किलो भरले. म्हणजे ५० किलोचा फरक पडला व परत तिथून आत आल्यावर छोट्या काट्यावर वजन केले असता निव्वळ वजन १३ किंटल ६ किलो भरले. परत वजन काट्यावर वजन केल्यावर निव्वळ वजन १३ किंटल १५ किलो भरले म्हणजे ९ किलोचा फरक पडला असे एकूण वजनामध्ये ५९ किलोची तफावत आढळून आली.
हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस हे आजही अविवाहित”, आमदार भास्कर जाधव असे का म्हणाले?
हेही वाचा – अमरावतीत बिबट्याच्या मृत्यूने खळबळ: विद्यापीठ परिसरात आढळला मृतदेह
याप्रकरणी रितसर पूर्ण पावत्यासहित तक्रार दाखल केल्यानंतर वैधमान अधिकारी मालशेष्टीवार, वरिष्ठ निरीक्षक हनवते, सहाय्यक निबंधक कर्मचारी सचिन बकाले यांनी संबधित वजन काट्याची तपासणी केली असता त्यात जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे निर्दशनास आले. यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करुन वजन काट्याचे इंडिकेटर जप्त केले व संबधित काटा पंचनामा करुन सील करण्यात आला. पुढील कार्यवाही होईपर्यंत त्या काट्यावर कुठल्याही प्रकारचे व्यवहार करु नये, अशी सक्त ताकीद दिली.