नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी आणि जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांनी विभागातील सात प्राध्यापकांना त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार असल्याची बतावणी करीत, त्यांच्याकडून प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी १५ लाख ५० हजार रुपये घेत फसवणूक केल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरुंसह राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या तक्रारीनुसार, डॉ. धर्मेश धवनकर यांनी लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र वासनिक, प्रवास व पर्यटन विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक बोरकर, ग्रंथालयशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सत्यप्रकाश निकोसे, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सत्यप्रकाश इंदूरवाडे, जीवरसायन विभागप्रमुख डॉ. विरेंद्र मेश्राम, मराठी प्रभारी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांना तुमच्या विभागातील काही मुलींनी तुमच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्याचे सांगितले. त्या तक्रारीवर लिगल सेलची तथ्थशोधन समिती गठीत करण्यात आली असून त्यात दोन वकील आणि मीसुद्धा आहे. हे दोन्ही वकील माझे मित्र असून तुम्हाला या प्रकरणातून मी बाहेर काढतो. त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल, त्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास संपूर्ण प्रकरण बिघडेल असेही सांगितले.

हेही वाचा: मला मते द्या, अथवा देऊ नका, मी कामे करतच राहणार; नितीन गडकरी

या तक्रारीत नमुद केल्यानुसार, या प्राध्यापकांना वर्तमानपत्रात बातमी छापून बदनामी करण्याचीही धमकी देण्यात आली. यापूर्वी हिंदी विभाग प्रमुखाविरोधात अशीच तक्रार असल्याने आपलीही नाहक बदनामी होईल या भीतीने पैसे देण्याची तयारी प्राध्यापकांनी दर्शविली. त्यानुसार त्यांनी प्रत्येक प्राध्यापकाला १० लाखांची मागणी केली. मात्र चर्चेअंती काहींनी सात तर काहींनी पाच लाख देण्याचे ठरले. २ लाख कनिष्ठ तर ५ लाख वरिष्ठ अधिवक्त्याला देण्यात येईल, असेही धवनकर यांनी सांगितले. प्राध्यापकांनी १५ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतरही हे प्रकरण पुन्हा निघण्याची धमकी देत पैसे मागण्यात आले. मात्र, काहीच केले नसताना केवळ तक्रारी दाखल असल्याची बतावणी करीत धवनकर यांनी फसवणूक केल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरूंकडे ४ नोव्हेंबरला केली. दरम्यान, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

बुलढाणा: उद्धव ठाकरेंच्या चिखलीतील सभेला पोलिसांची सशर्त परवानगी

सात दिवसांपासून कारवाईची प्रतीक्षा

विद्यापीठाच्या विविध विभागातील सात विभागप्रमुखांनी डॉ. धर्मेश धवनकर यांच्या विरोधात ४ नोव्हेंबरला तक्रार दाखल केली. मात्र, आज या तक्रारीला सात दिवसांचा कालावधी झाला असतानाही डॉ. धवनकर यांना साधा खुलासाही मागण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकी काय तक्रार केली आहे हे मला माहीत नाही. मात्र, या तक्रारीला काही अर्थ नाही. त्यामुळे अधिक काही बोलता येणार नाही. – डॉ. धर्मेश धवनकर, जनसंपर्क अधिकारी, नागपूर विद्यापीठ.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Looting of professors for fear of sexual abuse complaints complaint against pr officer university of nagpur tmb 01