नागपूर: प्रथम करोना व त्यानंतर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाची आर्थिक कोंडी झाली होती. परंतु विविध उपायांमुळे आता एसटी आर्थिक अडचणीतून हळू- हळू बाहेर येत आहे. जुलै महिन्यात एसटीच्या ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा कमवला आहे. त्यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा एसटीचा तोटा खूपच कमी झाला आहे.
एसटी महामंडळाचा तोटा या महिन्यात २२ कोटी इतका आहे. यंदा एप्रिल ते जुलै, २०२४ मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा तोटा १३१ कोटी रुपयांनी कमी झाला आहे. सलग दोन वर्षे करोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेल्या दीर्घकालीन संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती कोलमडली होती. त्यामुळे एसटी महामंडळ बंद पडते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली.
हेही वाचा – पटोले म्हणतात,‘महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीदासाठी …’
दरम्यान मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. परंतु यावेळी एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविण्याचे मोठे आवाहन महामंडळापुढे होते. दरम्यान शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास, सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या ५३ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत आहे.
एसटी महामंडळाने प्रवश्यांसाठी राबवलेले नवीन उपक्रम
एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यामध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या.
हेही वाचा – बुलढाणा : वादग्रस्त भक्तीमहामार्ग विरोधात शेतकरी उतरले पैनगंगेत…
कोणत्या विभागाला किती नफा?
एसटी महामंडळाच्या प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून जुलै महिन्यामध्ये ३१ विभागांपैकी १८ विभाग नफ्यामध्ये आले आहेत. त्यापैकी जालना (३.३४ कोटी), अकोला (३.१४ कोटी), धुळे (३.७ कोटी), परभणी (२.९८ कोटी), जळगाव (२.४० कोटी), बुलढाणा (२.३३ कोटी) या विभागांनी २ कोटीपेक्षा जास्त नफा कमावला आहे. ऑगस्ट महिन्यात उर्वरित विभाग देखील नफ्यामध्ये येतील व पर्यांयाने महामंडळ नफ्यात येईल जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला.
© The Indian Express (P) Ltd