नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी वीजनिर्मिती केंद्रातील ६६० मेगावॅटच्या नवीन संचामध्ये वारंवार बाॅयलर ट्यूब लिकेज (बीटीएल) होत आहे. निकृष्ट कोळशामुळे असा प्रकार घडत असल्याची तक्रार आहे. हे संच बंद पडल्याने राज्याचे २१५ दशलक्ष वीज युनिटचे नुकसान झाले आहे. या विषयावर महानिर्मितीचे अधिकारी उत्तर देत नसल्याने तक्रारीबाबत शंका वाढत आहे.
महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्पात ६६० मेगावॅटचे ३ आणि २१० मेगावॅटचा एक असे एकूण चार संच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या ६६० मेगावॅटच्या नवीन संचातील बाष्पकांमध्ये वारंवार बॉयलर ट्यूब लिकेजची समस्या उद्भवत आहे. तीन महिन्यांमध्ये ४ ते ५ वेळा हे संच बंद पडले. एकदा बाॅयलरच्या दुरुस्तीनंतर ६ महिने ते एक वर्षे पुन्हा त्यात दोष निर्माण होणे अपेक्षित नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.
हेही वाचा – नागपूर : भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक; भीषण अपघातात एक ठार, ८ जखमी
दरम्यान, धुतलेल्या निकृष्ट कोळशामुळे वारंवार बाॅयलर ट्यूब लिकेज होत असल्याची तक्रार ‘लोकसत्ता’ला प्राप्त झाली आहे. या विषयावर एक महिन्यापूर्वी कोराडीचे मुख्य अभियंता विजय राठोड यांना विचारणा केली असता लवकरच उत्तर देऊ असे, त्यांनी कळवले. परंतु अद्याप उत्तर आले नाही. दरम्यान, ६६० मेगावॅटच्या संचातून राज्यात सर्वात स्वस्त वीज निर्माण होते. हे संच वारंवार बंद पडल्याने महानिर्मितीला इतर संचातून वीज निर्माण करावी लागली. त्यामुळे महागडी वीज महावितरणला दिल्याने वीज कंपन्यांना त्याचा फटका बसला. हे संच वारंवार बंद पडल्याने सुमारे २१५ दशलक्ष युनिट वीज कमी मिळाली. महावितरणला या काळात महागडी वीज इतर स्त्रोतांकडून खरेदी करावी लागली.
हेही वाचा – सावधान.. आपल्या भागातील पाणी शुद्ध आहे काय? राज्यात किती नमुने दूषित पहा..
तक्रार काय?
‘लोकसत्ता’कडे आलेल्या तक्रारीनुसार, कोराडी प्रकल्पाला उपलब्ध होणाऱ्या कोळशाचा उष्माक ३,९०० ते ४,००० दाखवला जातो. परंतु बंकरमधील उष्मांक तपासला असता तो ३,३०० पेक्षा कमी असतो. त्यामुळे हा उष्मांक ७०० ने वाढवून दाखवला जातो काय, हा प्रश्न उपस्थित होतो. नियमानुसार उष्मांकातील तफावत १२० हून अधिक नको. परंतु येथे जास्त असल्याने येथे धुतल्या जाणाऱ्या कोळशाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या धुतलेल्या कोळशामध्ये ३९ टक्के राख आली आहे. ही निकषाहून जास्त असल्याचाही दावा तक्रारीत आहे.