वर्धा : प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न आल्यास त्याचे सरसकट गुण देण्याची बाब तलाठी परीक्षेतील उमेदवारांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. या परीक्षेतील प्रश्नसुचीवर आक्षेप मागविण्यात आले होते. त्यात ११४ प्रश्न चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले. या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार असल्याचे तलाठी परीक्षा राज्य समन्वयकाकडून जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा – नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा करू- देवेंद्र फडणवीस; ‘नमो महारोजगार’ मेळाव्याचे उद्घाटन
राज्यात ४ हजार ४४६ तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी राज्यातून १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज आले होते. प्रत्यक्षात ८ लाख ६४ हजार ९६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अधिक संख्या असल्याने भूमी अभिलेख विभागाने तीन टप्प्यांत परीक्षा घेतली. परीक्षेची एकूण ५७ सत्रे पार पडली. २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोंबर दरम्यान आक्षेप मागविण्यात आले. १६ हजार २०५ पैकी ९ हजार ७२ आक्षेप मान्य झाले. त्यातील ३२ प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आले. तर ११४ प्रश्न किंवा उत्तरे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचे पूर्ण गुण देण्याचा निर्णय झाला आहे. भूमी अभिलेख विभागाने गुणसुची तयार केली आहे. अंतिम निर्देश आल्यानंतर ती जाहीर होणार. त्यानंतर निवडसुची जाहीर केली जाईल, असे सूचित झाले.