वर्धा : प्रेमाला भाषा बंधन नाही. कुठलेही बंधन झुगारून फुलते तेच खरे प्रेम, असे अनेक शाहीर बोलून गेलेत. पण इथे तर मौनातच व ते सुद्धा शाळकरी वयात आनंदवनाच्या छायेत फुललेल्या प्रेमास बहर येत गेला अन् श्रीरामाच्या साक्षीने विवाहवेदीवर त्यास पूर्णत्व आले. जगावेगळी ही प्रेमाची परिणयात गोड समारोप झालेली कथा एका मूकबधिर मैत्रीची आहे.
गिरड येथील प्रदीप सोनवणे व चंद्रपूर तुकूम येथील दीप्ती कींनाके यांनी आप्तांनाही दूर लोटत आपले सहजीवनाचे स्वप्न शुक्रवारी पूर्ण केले. जन्मतः मुकबधीर असलेले प्रदीप व दीप्ती वरोरा येथील आनंदवनातील शाळेत शिकायला होते. तिथेच अबोल मैत्री फुलली. शाळा सोडल्यानंतरही दहा वर्षे मैत्रीतील गारवा कायम राहिला. मोबाइलच्या ‘व्हीडिओ कॉल’ माध्यमातून सांकेतिक भाषेने संवाद होत होताच. प्रेमंकुर फुलू लागले, मग दिप्तीनेच वडिलांना मनातील गुपित सांगितले. लग्नाची इच्छा मांडली. प्रखर विरोध दिसून येताच तिने थेट मुलाचे गाव गाठले. स्वहिमतीवर मुलाच्या कुटुंबाकडे त्यांची सून होण्याची भावना मौनातच साभिनय व्यक्त केली.
हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारसाठी ‘वाईन’ झाली आता ‘फाईन’ – वडेट्टीवार
ती मान्य झाली. मुहूर्त ठरला. तिने आईवडील यांनाही आशीर्वाद देण्यासाठी गळ घातली. त्यांनी पाठ फिरवली पण तिच्या काही अबोल सख्यांसह मित्र-मैत्रिणी मात्र लगबग करीत गिरडच्या श्रीराम मंदिरात पोहोचल्या. कन्यादानही मित्रांनीच करण्याची ही अनोखी रीत ज्येष्ठांना पाहायला मिळाली. आनंदाला वाचा फुटली. गावातील मान्यवर तसेच तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष राकेश चंदनखेडे आपल्या सहकाऱ्यांसह अक्षदा टाकण्यास उपस्थित होते. ‘हम तुम दोनो जब मिल जाएंगे, एक नया इतिहास बनायेंगे’ या गीताची ही सार्थ अनुभूती म्हणावी. तसेच 25 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या जागतिक मूक बधिर सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर एक सुखद संकेतही.