चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या प्रेमी युगुलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर प्रियकराचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. अश्विनी (२२) असे मृत तरुणीचे तर अरुण सुखदास कोडवते (२२, रयतवाडी) असे युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण कोडवते हा शेतकरी आहे. अश्विनी ही शेजारच्या गावातील तरुणी असून एका लग्नात त्यांची भेट झाली. प्रेसंबंध जुळले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अश्विनीच्या मोठ्या बहिणीचे लग्न व्हायचे असल्याने दोघेही दोन वर्षे थांबले. प्रेमसंबंधाची कुणकुण तरुणीच्या भावाला लागली. त्यामुळे कुटुंबीय चिडले. अरुणच्याही घरी माहिती झाले. त्यालाही घरातून विरोध होता. गेल्या आठ दिवसांपूर्वी दोघेही एका ठिकाणी भेटले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : ‘अग्निवीर’ भरतीसाठी विदर्भातून ६० हजार तरुण नागपुरात येणार
गुरुवारी अश्विनीने घरातून पळ काढला आणि थेट अरुणच्या घरी आली. अचानक अश्विनीला घरी बघून अरुण हादरला. परंतु, त्याने आईवडील आणि भावंडाची समजूत घालून लग्न लावून देण्यासाठी तयार केले. दुसऱ्या दिवशी अश्विनीचे दोन भाऊ अरुणच्या घरी आले. त्यांनी अश्विनीला सोबत घरी येण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार दिला. त्यामुळे दोघेही भाऊ घरी परतले. दुसऱ्या दिवशी अश्विनी आणि अरुण यांनी कीटकनाशक प्राशन केले.
शेजाऱ्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. अश्विनीचा मृत्यू झाला तर अरुणला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.