नागपूर : राज्यात पूर्व विदर्भापासून तर दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भ वगळता राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील ७२ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असून पुणे, मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ७२ तासानंतर पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर काही वेळी आकशात दाट ढग दाटून येण्याची शक्यता आहे. आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुळसाधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढगाळ हवामानासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच एक दोन तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत २७ ते २९ दरम्यान ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर २७ ते २८ दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पुण्यात पुढील तीन दिवस म्हणजेच २७ ते २९ दरम्यान ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर कोल्हापुर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांनादेखील २७ ते २९ दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात बीड, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात आज तर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर २८, २९ आणि ३० तारखेला ‘यलो अलर्ट’, तर गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस तर गोंदिया जिल्ह्यात २८ पासून पुढील तीन दिवस, नागपूरला आज आणि २९ आणि ३० तारखेला, तर वर्धा, वाशिम जिल्ह्यांना आज ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.