अकोला : लोकसभा निवडणुकीच्या मतदानात अकोला मतदारसंघामध्ये ४१.५० टक्के मातृशक्तीने मतदानाकडे पाठ फिरवली. पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाचे प्रमाण कमीच आहे. मतदारसंघात एकूण मतदान ६१.७९ टक्के असतांना महिलांच्या मतदानाचे प्रमाण ५८.५० टक्के आहे. ६४.८७ टक्के पुरुषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महिलांच्या मतदानाचे अल्पप्रमाण चिंतनीय आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला मतदारसंघात शुक्रवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदारसंघात उन्हाचा पारा चांगलाच चढला असतांनाही मतदान करण्यासाठी केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. दोन हजार ०५६ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. अकोला मतदारसंघात एकूण मतदान ६१.७९ टक्के झाले आहे. १८ लाख ९० हजार ८१४ मतदारांपैकी ११ लाख ६८ हजार ३६६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये नऊ लाख ७७ हजार ५०० एकूण पुरुष मतदारांमधील सहा लाख ३४ हजार ११५ मतदारांनी मतदान केले. महिला मतदारांची एकूण संख्या नऊ लाख १३ हजार २६९ आहे. त्यातील पाच लाख ३४ हजार २३९ महिलांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. ४१.५० टक्के म्हणजेच तीन लाख ७९ हजार ०३० महिला मतदानाला गैरहजर राहिल्या आहेत. महिलांच्या मतदानात देखील बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक ६२.९९, तर अकोला पश्चिममध्ये सर्वात कमी ५१.८३ टक्के मतदान झाले. याशिवाय अकोट ५९.७७, अकोला पूर्व ५६.१०, मूर्तिजापूर ६०.६२ आणि रिसोड मतदारसंघात ६०.८६ टक्के महिलांचे मतदान झाले.
हेही वाचा…यवतमाळ : २०१९ च्या तुलनेत १.७८ टक्क्यांनी वाढ, आदिवासीबहुल राळेगावमध्ये सर्वाधिक मतदान
सात लाखावर मतदारांची दांडी
अकोला लोकसभा मतदारसंघात तब्बल सात लाख २२ हजार ४४८ मतदारांनी मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याला दांडी मारली. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. २०१९ च्या तुलनेत किंचित टक्केवारीमध्ये वाढ झाली. मात्र, अपेक्षित मतदान झालेले नाही. उन्हाराचा चढता पारा, लग्नसराई व बहुतांश मतदार बाहेरगावी असल्याने ३८.२१ टक्के मतदार मतदानासाठी गेले नाहीत.
हेही वाचा…जंगलात पाणी मिळेना, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला; तहान भागविण्यासाठी…
‘अकोला पश्चिम’च्या महिलांमध्येही निरुत्साह
लोकसभा मतदारसंघातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पुरुषांप्रमाणे महिला मतदारांमध्ये देखील निरुत्साह दिसून आला. या भागातील एक लाख ६४ हजार ८०५ महिला मतदारांपैकी केवळ ८५ हजार ४२३ महिलांनी मतदान केले. ४८.१३ टक्के महिला मतदानाला गैरहजर राहिल्या आहेत. या भागात कमी झालेल्या मतदानाचा फायदा व तोटा कुठल्या उमेदवारांना यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत.