नागपूर : ‘लम्पी’ रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी विषाणूच्या जनुकीय बदलाची माहिती घेतली जाणार असून त्यासाठी जनावरांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लसीकरण झालेल्या जनावरांची रोगप्रतिकार शक्ती किती वाढली याचेही मूल्यमापन केले जाणार आहे. हे दोन्ही अहवाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात अपेक्षित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात २९ ऑक्टोबपर्यंत ३३ जिल्ह्यांमधील एकूण ३१७६ गावांमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव दिसून आला. अडीच हजारांवर जनावरे आतापर्यंत मृत्युमुखी पडली आहेत. प्रशासनाकडून लसीकरणासह इतरही उपाय केले जात आहेत, मात्र साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे ‘लम्पी’ रोगाच्या विषाणूची ‘जिनोम’ क्रमवारिता तपासणीसाठी नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती प्राप्त होईल. ही माहिती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात अपेक्षित आहे. तसेच लशीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावांतील जनावरांच्या लसीकरणापूर्वीचे व नंतरचे ७, १४, २१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करून ते बंगळूरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोग माहिती संस्था येथे पाठवण्यात आले आहेत. त्यांचे निष्कर्षदेखील नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात अपेक्षित आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली

पशुपालकांना ६.६७ कोटींची मदत

राज्यात ‘लम्पी’ चर्मरोगामुळे मृत पावलेल्या २,५५२ जनावरांच्या मालकांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. त्यानुसार पशुपालकांच्या खात्यावर नुकसानभरपाईपोटी ६.६७ कोटी जमा करण्यात आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lumpy skin disease affected animal samples sent in pune laboratory to test genetic modification of virus zws