वर्धा : वाढत्या बेरोजगारीमुळे रेल्वेत नोकरी मिळते म्हणून धाव घेणारे अनेक असतात. प्रसाद हा तरुण असाच फसला. त्याची अमरावती जिल्ह्यातील येरला गावच्या अनंत पांडेसोबत दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रसादला त्याने रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगत बारा लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. दिल्लीत रेल्वे स्थानकावर दोन व्यक्तींशी ओळख करून देत प्रसादकडून पाच लाख रुपये घेतले.
वर्षभरापूर्वी नोकरीचे नेमणूक पत्र व नंतर स्थायी झाल्याचेही पत्र देण्यात आले. विशेष म्हणजे, दिल्लीत वीस दिवसांचे प्रशिक्षण असल्याचे सांगत विविध स्थानकांवर फिरविले. ज्या ठिकाणी नेमणूक झाल्याचे पत्र होते, त्या ठिकाणी कार्यालय नसल्याचे पाहून प्रसादला धक्काच बसला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रसादने थेट पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची भेट घेत आपबिती सांगितली.
हेही वाचा – चंद्रपूर : गोसेखुर्दच्या कामावर शॉक लागून कामगाराचा मृत्यू
दाखविण्यात आलेली कागदपत्रे पूर्णतः बनावट असल्याचे लक्षात आल्यावर प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेने हातात घेत तक्रार दाखल केली. पोलीस पथकाने तपास सुरू करीत आरोपी अनंत पांडे याचे मोर्शी तालुक्यातील येरला गाव गाठले. तिथे आरोपीने चांगलाच गोंधळ घातला. ओरडा करीत गावकऱ्यांना जमा केले. तपास अधिकाऱ्याच्या हाताला चावा घेत पळण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसी हिसका बसताच आरोपी ताळ्यावर आला. त्याची चौकशी सुरू आहे.