नागपूर : तुर्कमेनिस्तान देशातून नुकत्याच एका सुंदर सापाच्या प्रजातीला त्याचे अस्तित्व मिळवून देण्याचे काम वन्यजीव संशोधकांनी केले आहे. या संशोधनामध्ये ११ देशांमधील विविध संशोधकांचा समावेश आसून, भारतामधून अमीत सैय्यद, विवेक शर्मा, एस. आर. गणेश, तसेच एच. टी. लारेमसंगा यांचा मोलाचा वाटा आहे.
‘लायकोडॉन बायकलर’ असे याचे नाव असून, हा ‘लायकोडॉन’ कुळातील साप आहे. या कुळातील सापांना इंग्रजीत ‘उल्फ स्नेक्स’, तर मराठीत ‘कवड्या’ जातीचा साप म्हणतात.
हेही वाचा – नागपूर : ‘कुनो’तील चित्ते घेणार मोकळा श्वास, पण…
‘लायकोडॉन’ कुळात आतापर्यंत ७३ प्रजातींच्या सापांची नोंद आहे. ‘लायकोडॉन बायकलर’ हा पूर्वी ‘लायकोडॉन स्टेयेटस’ नामक एका प्रजातीच्या नावाने ओळखला जात होता. भारत, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, तसेच तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये या सापाची नोंद असल्याचे नमूद केले गेले होते. भारतातील तसेच इतरही देशांतील काही वन्यजीव संशोधक ‘लायकोडॉन’ या सापांवर गेली कित्येक वर्षे अभ्यास करीत होते. या अभ्यासात विविध देशांमध्ये असलेले सापांचे नमुने अभ्यासणे, त्यांच्या नोंदी घेणे, जनुकीय चाचण्या करणे, असे सर्व शास्त्रीय परीक्षण करण्यात आले.
हेही वाचा – गडचिरोली : मारहाणप्रकरणी नाना पटोलेंच्या भावावर गुन्हा
या अभ्यासादरम्यान संशोधकांच्या असे लक्षात आले की, ‘लायकोडॉन बायकलर’ ही प्रजाती ‘लायकोडॉन स्ट्रेयेटस’ नसून एक वेगळीच प्रजाती आहे. ती वर नमूद केल्याप्रमाणे सर्वत्र आढळत नसून तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, ताजाकिस्तान, पाकिस्तान, तसेच भारतातील उत्तरेकडील भागातच आढळते. त्याचबरोबर ‘लायकोडॉन स्ट्रेयेटस’ हा साप भारताच्या पूर्वेकडील भाग, तसेच दक्षिणेकडील भाग आणि सोबतच श्रीलंकेतदेखील आढळतो. दोन दिवसांपूर्वी प्रकाशित या शोधनिबंधामुळे कवड्यावर्गीय सापाच्या जातीमध्ये शास्त्रीयदृष्ट्या जो गोंधळ होता तो आता स्पष्ट झाला आहे. एका सापाच्या प्रजातीला त्याचे अस्तित्त्व मिळाले. या सापाच्या संशोधनामुळे ही संख्या आता ७४ झाली आहे. या सापाचे नाव ‘लायकोडॉन बायकलर’ असे असून, या सापाचा शोध तुर्कमेनिस्तानमधून लागला आहे.