नागपूर : मध्यप्रदेशातून एक युवक कामाच्या शोधात नागपुरातील मित्राकडे आला. हाताला काम मिळेपर्यंत काही दिवस घरी मित्राच्या घरी मुक्कामी थांबला. मात्र, त्याने मित्राच्याच बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. त्या पळून गेलेल्या प्रेमी युगुलाचा गुन्हे शाखेच्या एएचटीयूने शोध घेतला. तरुणीला दोन वर्षांच्या बाळासह भावाच्या ताब्यात दिले तर युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज कुमार (३५) हा मूळचा जबलपूर-मध्यप्रदेशचा आहे. बेरोजगार असलेल्या मनोजने कामाच्या शोधात नागपूर गाठले. दोन दिवस फुटपाथवर दिवस काढल्यानंतर त्याने प्रदीप नावाच्या मित्राला फोन केला. त्याने मित्राला घरी नेले. प्रदीपला चार बहिणी असून आईवडिलांचे निधन झाले आहे. हाताला काम मिळेपर्यंत मनोजला प्रदीपने आपल्या घरी ठेवले. त्याच्या चार बहिणीपैकी दुसऱ्या क्रमांकाची १५ वर्षीय बहिण टीना (काल्पनिक नाव) हिच्याशी मनोजची जवळिक वाढली.
हेही वाचा >>> नागपूर : नऊ महिन्यांच्या बालकावर गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया
काही दिवसांतच दोघांची मने जुळली. दहावीत शिकणाऱ्या टिनाला मनोजने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एकाच घरात राहत असल्यामुळे दोघांचे प्रेमसंबंध प्रस्थापित केले. मनोजने मित्राचा विश्वासघात करीत टिनाचा गैरफायदा घेतला. टिनासुद्धा मनोजच्या प्रेमात पार वेडी झाली. भाऊ घरातून बाहेर पडल्यानंतर ती मनोजसोबत बाहेर पडत होती. दोघांच्या प्रेमसंबंधाची कुठलीही कुणकुण बहिण-भावंडांना लागली नाही. यादरम्याने मनोजच्या हाताला काम मिळाले. तो घरात प्रदीपची आर्थिक मदत करायला लागला आणि काही पैसे प्रेयसी टिनावरही खर्च करायला लागला.
हेही वाचा >>> वर्धा : ‘या’ तालुक्यात बियाणे विक्रीस मनाई, कृषी केंद्राचा भोंगळ कारभार
त्यामुळे टिनाने मनोजशी सुखी संसाराची स्वप्ने रंगवली. टिनाने मनोजला लग्नाचा गळ घातली. मात्र, मनोजने १६ वर्षाच्या टिनाची समजूत घातली. त्यामुळे लग्न करण्यास अडचण असल्याचे सांगितले. त्यावर टिनाने पळून जाऊन लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. जून २०२० मध्ये बहिण-भाऊ कामावर निघून गेल्यानंतर टिना-मनोज यांनी घरातून पळ काढला. दोघेही जबलपूरला गेले आणि त्यांनी तेथे मंदिरात लग्न केले.
हेही वाचा >>> नागपुरात विदर्भातील तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती, कधी, कुठे?
टिना मित्रासोबत पळून गेल्यानंतर प्रदीपने एमआयडीसी ठाण्यात तक्रार दिली. दोन वर्षे प्रेमी युगुलांचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे प्रकरण सोपवले. गुन्हे शाखेने केवळ चार दिवसांत प्रेमी युगुलाचा शोध घेतला. त्यावेळी टिनाला दोन वर्षांची चिमुकली होती तसेच ती चार महिन्यांची गर्भवती होती. तिला भावाच्या ताब्यात देण्यात आले तर मनोजला अटक करून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा कारवाई सहायक निरीक्षक रेखा संकपाळ, समाधान बजबळकर, उपनिरीक्षक बलराम झाडोकार, दीपक बिंदाने, नाना ढोके, सुनील वाकडे, मनिष पराये, ऋषिकेश डुमरे आणि शरीफ शेख यांनी केली.