नागपूर : देशातील व्याघ्रप्रकल्पाच्या संख्येत आता ५८व्या व्याघ्रप्रकल्पाची भर पडली आहे. मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली आहे. मध्यप्रदेशातील हा नववा व्याघ्रप्रकल्प असून गेल्या तीन महिन्यात सलग दुसरा व्याघ्रप्रकल्प या राज्याला मिळाला आहे. मध्यप्रदेश सरकारने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे

१९५६ मध्ये स्थापन झालेल्या माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे. मध्यप्रदेशातील हा नववा व्याघ्र प्रकल्प आहे. दोन वर्षांपूर्वी माधव राष्ट्रीय उद्यानात दोन मादी आणि एक नर वाघ सोडण्यात आला होता. मादी वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला.

आता आणखी दोन वाघिणी या व्याघ्रप्रकल्पात सोडल्या जातील. यामुळे वाघांची संख्या सात होईल आणि नैसर्गिक प्रजननातून वाघांची संख्या वाढेल, असा विश्वास मध्यप्रदेश सरकारला आहे.

कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता आणि माधव राष्ट्रीय उद्यानात वाघ असल्याने पर्यटकांना दोन मोठे वन्यप्राणी पाहण्याची संधी मिळेल. वाघासोबतच, बिबट्या, लांडगा, कोल्हा, साळू, अजगर, चिंकारा इत्यादी वन्यप्राणी देखील माधव राष्ट्रीय उद्यानात आढळतात.

याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले, राज्यातील दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पाचे तीन महिन्यांत उद्घाटन होणे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. रतापाणी व्याघ्रप्रकल्प हा डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या नावावर असलेला आठवा व्याघ्र प्रकल्प होता. डिसेंबर २०२४ मध्ये या व्याघ्रप्रकल्पाची घोषणा झाली होती.

माधव व्याघ्रप्रकल्प हा मध्यप्रदेशातील सर्वात नवीन व्याघ्रप्रकल्प आहे. तो मध्यप्रदेशातील नववा तर देशातील ५८वा व्याघ्रप्रकल्प आहे. सर्व वन्यजीवप्रेमी आणि संवर्धनकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. हा विकास आमच्या वनाअधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे.

भूपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री

मध्य प्रदेशात ७८५ वाघ

मध्य प्रदेशात कान्हा, सातपुडा, बांधवगड, पेंच, संजय डुबरी, पन्ना, वीरांगना दुर्गावती आणि रतापाणी ही आठ व्याघ्रप्रकल्प आधीपासून आहेत. त्यात आता माधव व्याघ्रप्रकल्पाच्या रुपाने नवव्या व्याघ्रप्रकल्पाची भर पडली आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या ७८५ असल्याचा अंदाज आहे, जी देशातील सर्वाधिक संख्या आहे.

Story img Loader