नागपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात जवळपास २१ पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला गँगस्टर बंडू उर्फ अंकित पटेल हा वेश बदलून नागपूरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होता. अंकितला अटक करण्यासाठी साध्या वेशात आलेल्या मध्यप्रदेश पोलिसांनी टांगा चौकात त्याला घेरले. त्याला अटक करतानाच  त्याने आरडाओरड करून नागरिकांना गोळा केले. नागरिकांनी त्या युवकाला मदत करण्याच्या अनुषंगाने पोलीस पथकावर हल्ला केला. त्यामुळे पोलीस पथक घाबरले.

दरम्यान तहसील पोलिसांचे वाहन तेथून जात असताना हा प्रकार लक्षात आला. तहसील पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना मदत करत अंकित पटेलला अटक करण्यात सहकार्य केले. मात्र, मध्यप्रदेश पोलीस पथकांवर झालेल्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. बड्डू ऊर्फ अंकित पटेल (वय २९, रा. जोशी मोहल्ला), असे गुन्हेगाराचे नाव आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उपराजधानीत लपून बसलेल्या आरोपीबाबत नागपूर पोलिसांना काहीच माहिती नसल्याने नंदनवन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कुख्यात गँगस्टर अंकित पटेलविरुद्ध दरोडा, लूट, बलात्कार, खंडणी, मारहाण व शस्त्र प्रतिबंधक कायद्यासह तब्बल २१पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गतही (एनएसए) कारवाई करण्यात आली होती.दोन महिन्यांपूर्वी जबलपूरमध्ये बड्डूविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच बड्डू हा पसार होत नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला होता. येथे तो नंदनवनमध्ये भाड्याने घर घेऊन राहायला लागला. याबाबत नंदनवन पोलिसांना काहीही माहिती नव्हती हे विशेष.

बड्डू पसार झाल्याने जबलपूर पोलिसांचे विशेष पथक त्याचा  शोध घेत होते. बड्डू हा नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहात असल्याची माहिती जबलपूर पोलिसांना मिळाली. शनिवारी रात्री जबलपूर पोलिसांचे पथक नागपुरात दाखल झाले.रात्री ९ वाजताच्या सुमारास बड्ड हा तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पत्नी व मुलासह टांगा स्टॅण्ड चौकात असल्याची माहिती जबलपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार जबलपूर पोलिसांचे पथक साध्या वेषात तेथे पोहोचले.

बड्डू दिसताच पोलिसांनी त्याला पकडले. यादरम्यान बड्डूने आरडा-ओरड केल्याने काही गुंड प्रवृत्तीचे युवक त्याचे अपहरण करीत असल्याचा समज नागरिकांना झाला. गैरसमजातून नागरिकांनी बड्डूला सोडविण्यासाठी पोलीस पथकावर हल्ला केला. आम्ही मध्य प्रदेश पोलीस आहोत आणि हा आरोपी आहे त्याला अटक करीत आहोत असे ते नागरिकांना सांगत होते परंतु, नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान या घटनेने टांगा स्टॅण्ड परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. यादरम्यान तहसील पोलिसांचे पथक तिथून जात असताना त्यांना हा प्रकार दिसला त्यांनी लगेच मध्य प्रदेश पोलिसांची मदत केली तहसील पोलिसांच्या मदतीने अंकित पटेलला ताब्यात घेऊन तहसील पोलीस ठाण्यात आणले तेथे चौकशी अंकित पटेल याला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले. मध्य प्रदेश पोलिस बड्डूला घेऊन जबलपूरकडे रवाना झाले.

बायकोने घेतला पोलिसाला चावा

अंकित पटेल च्या बायकोने पोलिसांची वाद घातला आणि पतीला अटक करण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला तिने एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला चावा घेऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही.

Story img Loader