वर्धा: दर बारा वर्षाने प्रयागला पूर्ण कुंभ होत असतो. १२ पूर्णकुंभ म्हणजे ( दर १४४ वर्षांनी ) एक महाकुंभ ठरतो. आता २०२५ मध्ये मकरसंक्रांती ते महाशिवरात्री या कालावधीत महाकुंभ लागणार आहे. जगभरातील १०० देशातून ४० कोटी लोकं या भव्य महा उपक्रमास भेट देतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे विविध प्रकारे प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महाकुंभ काळात एकदा वापरून फेकण्याचे म्हणजेच युज अँड थ्रो प्रकारचे पोलिथीन वापरले गेल्यास अंदाजे रोज १२०० टन प्लास्टिक ग्लास व प्लेटचा कचरा निर्माण होईल. कोट्यावधी टन स्वरूपातील हा कचरा घातक ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘एक थाळी एक थैली ‘ हा उपक्रम नियोजित केला आहे. या उपक्रमात सहभाग देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इच्छुकांनी १०० रुपये किंवा त्या पटीने योगदान देणे अपेक्षित आहे. धर्म मजबूत करा, देशाचे पर्यावरण वाचवा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. आता पर्यंत जवळपास तीन हजार थाळ्या साठी १०० रुपये प्रत्येकी प्राप्त झाले आहेत. विदर्भ प्रांताकडून ५० हजार थाळ्या अपेक्षित आहे. थाळी तयार करणाऱ्यास ऑर्डर देण्यात आली आहे. २५ डिसेंबरपर्यंत हे सर्व साहित्य प्रयागराज येथे पोहचणे अपेक्षित आहे. जर त्यास उशीर झाला तर हे साहित्य केंद्रीय भांडारात पडून राहील. त्याचा योग्य विनियोग होवू शकणार नाही. म्हणून लवकरात लवकर सक्रिय होत योगदान देणे अपेक्षित असल्याचे संयोजक म्हणतात.

हेही वाचा : ‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…

पर्यावरण संरक्षण गतिविधी व भारतीय उत्कर्ष मंडळतर्फे महाकुंभ २०२५ हा पॉलिथीन मुक्त व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात थाळी व थैली पाठविण्यास सज्ज आहे. ऑनलाईन निधी देण्याची सोय आहे. तसेच राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुप जायस्वाल यांनी सेवा कार्यासाठी आवाहन केले आहे. त्रिवेणी संगम प्रयागराज येथे सहभागी होणाऱ्या कोट्यावधी हिंदू भाविकांची सेवा करायची आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेद्वारा महाकुंभ येथे सेवेसाठी वेळ देवू शकणाऱ्या ‘ समयदानी ‘ कार्यकर्त्यांची यादी तयार केल्या जात आहे. जानेवारी, फेब्रुवारी या काळात ५, १०, १५ दिवस सेवा देता येईल. उत्तर प्रदेश प्रशासनाने ११ पैकी एका रुग्णालयाची जबाबदारी हिंदू परिषदेस दिली आहे. त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी डॉक्टर, नर्सिंगची मुले अथवा मुली आपले नाव नोंदवू शकतात. आपल्या किंवा प्रवीण तोगडिया यांच्या ९८२५३२३४०६ या क्रमांकावर नोंदणी करू शकतात. या महाकुंभ मेळ्यात मोफत थांबण्यासाठी लिंकवर अर्ज सादर करता येईल असे जायस्वाल सूचित करतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kumbh mela 2025 prayagraj ek thali ek thaili initiative of rashtriya swayamsevak sangha rss pmd 64 css