चंद्रशेखर बोबडे

नागपूर : महामेट्रोनं प्रकल्प उभारणी करताना देखाव्यांच्या माध्यमातून नागपूरची संस्कृती आणि ओळख जपण्याचे प्रयत्न केले आहेत. देशाची व्याघ्र राजधानी ही नागपूरची ओळख दर्शवणारा देखावा कामठी मार्गावरील मेट्रो स्थानकाजवळ साकारण्यात आला आहे.

नागपूरला संत्रा नगरीसोबतच देशाची व्याघ्र राजधानी म्हणूनही ओळखले जाते. कारण नागपूरच्या तीनशे किलोमीटर परिसरात तीन व्याघ्र प्रकल्प आहेत. याठिकाणी देश-विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. महामेट्रोने ही बाब डोळ्यापुढे ठेऊन मेट्रोच्या कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकात जंगलाची आठवण करून देणारा देखावा साकारला आहे. मेट्रो मार्गाच्या खांबांवर वाघ, लांडगा, अस्वल आदी प्राण्यांचे चित्रे रेखाटली आहेत. पेंचव्याघ्र प्रकल्पाकडे जाताना हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेतो.

हेही वाचा- रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांसाठी जीवभक्षकच; चंद्रपूर-गोंदिया मार्गावर वाघाच्या मृत्यूनंतर पुन्हा मुद्दा चर्चेत

यापूर्वी महामेट्रोने चितारओळ स्थानकाजवळ नागपूरच्या प्रसिद्ध मारबतीचा व कॉटन मार्केट चौकात पोळ्याचा देखावा साकारला आहे. याशिवाय छत्रपती चौक, जयप्रकाश नगर, झाशी राणी चौक, सुभाष नगर स्थानकाजवळ वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित देखावे तयार करण्यात आले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या संकल्पनेतून हे सर्व देखावे तयार करण्यात आले आहेत. प्रकल्पउभारणी करताना नागपूरची ओळख लोकांपुढे वेगळ्या माध्यमातून मांडणे ही या मागची भूमिका असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

Story img Loader