अकोला : ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळावरून हवाईसेवा रखडण्यामागे राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. केंद्र शासनाच्या उडाण योजनेंतर्गत राज्य सरकारने करार केला नव्हता. त्यामुळे अकोल्यातून विमानसेवा सुरू झाली नाही, असा गंभीर आरोप भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांनी केला. आता ती अडचण दूर झाली असून अस्तित्वातील धावपट्टीवरूनच १९ आसनी विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
खासदार धोत्रे यांनी ‘लोकसत्ता’शी विशेष संवाद साधला. मतदारसंघातील प्रश्न, विकास कार्य, प्रकल्प आदींविषयी सविस्तर चर्चा करून त्यांनी आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. पश्चिम विदर्भातील हवाई वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या शिवणी विमानतळाचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य राहील. धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी खासगी जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. त्यासाठी भाजपचे आमदार राज्य शासनाकडे पाठपुरावा करतीलच. तत्कालीन राज्य सरकारने करार न केल्याने येथून विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. आता ती अडचण दूर झाली आहे.
आणखी वाचा-नागपूरः मध्य भारतात त्वचापेढी नसल्याने जळालेल्या रुग्णांचे हाल
शिवणीवरून हवाईसेवेला प्रारंभ होण्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. हवाईसेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत देखील बोलणी झाली असून त्यांनी शिवणीवरून विमानसेवा सुरू करण्यास तयारी दर्शवली आहे. शिवणी विमानतळाच्या सध्या अस्तित्वातील १४०० मीटर धावपट्टीवरूनच १९ आसनी विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खासदार धोत्रे यांनी दिली. त्याचा लाभ व्यापार, उद्योग व व्यवसाय वाढीसाठी होईल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यातील शिवणी विमानतळाच्या विकासासाठी केंद्र सरकार भरघोस निधी देईल, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातून जाणाऱ्या बहुतांश राष्ट्रीय महामार्गांचे कामे पूर्ण झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ चे चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेले. अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ची सुद्धा निर्मिती झाली. अकोला-अकोट मार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या होत्या. आता कंत्राटदार बदलल्यानंतर या मार्गाचे देखील काम अंतिम टप्प्यात आले आहे. गांधीग्राम येथे नव्याने पूल बांधण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. केंद्र शासनाच्या योजनांमधून जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न राहणार असल्याचे खासदार धोत्रे यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-‘एमपीएससी’ उत्तीर्ण होऊनही नियुक्तीची प्रतीक्षा; अकरा महिन्यांपासून ‘कृषी’चे विद्यार्थी प्रतीक्षेतच
औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणावर भर
औद्योगिक विकासाचा विचार केल्यास अनेक मोठे उद्योग कार्यरत असून हजारो युवकांसाठी रोजगार उपलब्ध आहेत. त्याठिकाणी रस्त्यांसह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्ह्यात ‘ट्रान्सपोर्ट हब’ देखील आहे. कृषी प्रक्रिया उद्योगाला जिल्ह्यात पोषक वातावरण असून त्या दृष्टीने जिल्ह्यात आणखी मोठे उद्योग आणण्यासाठी देखील पुढाकार घेईल. औद्योगिक वसाहतीमध्ये बहुतांश मध्य, लघु उद्योग सुरू आहेत. आगामी काळात मोठे उद्योग येथे आणण्यासाठी औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण करण्यावर प्रामुख्याने भर राहणार असल्याचे खासदार धोत्रे यांनी सांगितले.
अकोला-इंदूर राष्ट्रीय महामार्गाने जोडणार
मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये मोठी बाजारपेठ असून अकोल्यातील बहुतांश व्यापार त्यावर अवलंबून आहे. अकोल्यातून देखील कृषी व इतर उत्पादित माल इंदूरसह मध्यप्रदेशमधील विविध ठिकाणी जातो. दळणवळणाची सुविधा निर्माण होण्यासह दोन प्रमुख बाजारपेठ इंदूर आणि अकोला राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच त्या प्रकल्पाला मंजुरी मिळेल, असा आशावाद खासदार धोत्रे यांनी व्यक्त केला.