अमरावती : येत्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठा इतिहास घडणार असून या निवडणुकीत तिवसा विधानसभेसह राज्यातील २०० पेक्षा अधिक आमदार व अमरावती लोकसभेसहित ४५ खासदार हे भाजपा-शिवसेना युतीचे विजयी होतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी रात्री अमरावतीत नेहरू मैदानावर झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्‍हणाले, राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती होय. घुबड दिवसा काम करू शकत नाही, ते केवळ रात्रीच बाहेर पडते, कावळा केवळ दिवसा दिसतो आणि सरडा वेळोवेळी रंग बदलतो. सरड्याने गरूडाची साथ सोडली आणि त्‍याचे दिवस फिरले. अशी ही महाविकास आघाडी टिकणारी नसून येत्या दिवसात काँग्रेससह अन्य विरोधकांचा पराभव निश्चित आहे. याउलट राज्‍यात भाजप नव्याने गरुडझेप घेऊन नवीन कीर्तिमान स्थापित करेल, असा विश्‍वास त्यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचा… “एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद घटनाबाह्य,” जितेंद्र आव्हाड यांचा दावा; म्हणाले, “तीन महिन्यांच्या आत…”

हेही वाचा… यवतमाळ : नगर परिषदेतील घनकचरा निविदा प्रक्रियेमधील गैरप्रकाराची चौकशी, आयुक्तांनी नियुक्त केलेली समिती धडकली

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खिशाला कधीच पेन दिसला नाही. मुख्यमंत्री म्हणून ते केवळ दोन वेळा मंत्रालयात गेले होते. घरीच बसून त्यांनी डोळे मिटूनच कामकाज सांभाळले. शरद पवारांनी तशी माहिती जगजाहीर करून ठाकरेंच्‍या या कामाची जाहीर पावतीच दिली. उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद चोरले. त्यांचे ५० आमदार सोडून गेले, तरी त्यांना त्याची पुसट कल्पनाही नव्हती आणि आता तेच मोठ-मोठ्या गोष्‍टी करीत आहेत. परंतु आता त्यांच्याखाली जी आग लागली आहे, त्यामुळेच भयंकर अस्वस्थ झाले असून येत्या काही दिवसांत त्यांनी मुंबई महापालिकेत केलेली लूट बाहेर येणार असल्याचा दावाही यावेळी बावनकुळे यांनी केला.

Story img Loader