महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने नागपूरमध्ये काँग्रेस समर्थित उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी अलीकडेच या पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आणि येथे वंचितचाही उमेदवार रिंगणात आहे, त्यामुळे शिवसेना नेमकी कोणासोबत? असा पेच निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरची जागा महाविकास आघाडीत प्रथम शिवसेनेला सुटली होती. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. काहीच दिवसांत सेनेने नागपूरची जागा सोडून नाशिकची जागा लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागपूरची जागा काँग्रेसला सुटली. काँग्रेसने येथे माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला. त्यासोबतच अडबालेंच्या समर्थनार्थ शिवसेनेने त्यांचा अधिकृत उमेदवार मागे घेतला. राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा दिला. एकूणच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अडबाले यांना बघितले जाते. दरम्यान संपलेल्या आठवड्यात शिवसेनेने डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली. याच वंचितचा उमेदवार नागपुरात रिंगणात आहे. त्यामुळे येथे शिवसेना वंचितसोबत आहे की, महाविकास आघाडीसोबत? असा प्रश्न आहे.

हेही वाचा – चक्क वाघाच्या अधिवासात पार्टी करणे महागात पडले

हेही वाचा – नागपूर : नववीची विद्यार्थिनी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

दरम्यान सध्यातरी शिवसेनेचे नेते अडबाले यांचा प्रचार करीत आहेत. शुक्रवारी खासदार विनायक राऊत यांची सभा झाली. त्यांनी अधिकृतपणे अडबाले यांच्या पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला. दुसरीकडे आंबेडकर यांनीही वंचितचे उमेदवार खोब्रागडे यांच्यासाठी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. शिक्षक मतदारसंघात प्रथमच वंचितने त्यांचा उमेदवार दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha vikas aghadi vs vanchit in nagpur teachers constituency election shivsena role in question cwb 76 ssb