वर्धा : ओबीसी, विजेएनटी तसेच एसबीसी घटकातील अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे जेईई तसेच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण दिल्या जाते. सोबतच मोफत टॅब व सहा जीबी इंटरनेट डाटा मोफत मिळतो. मात्र त्यासाठी मुदत असते.
महाज्योतीने दहावीची परीक्षा सुरू असतानाच या दीड वर्षाच्या प्रशिक्षणाची नोंदणी मार्च महिन्यात सुरू केली होती. पुढे उत्तीर्ण होणार का, किती गुण मिळतील, अकरावीत प्रवेश मिळणार की नाही असा संभ्रम असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीच नव्हती. त्याच वेळी महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी दहावीचा निकाल लागल्यानंतरच नोंदणी सुरू करण्याची मागणी केली होती. पण ती एप्रिलमध्येच बंद झाल्याने आज अनेकांना वंचित राहण्याची आपत्ती आहे.
आता निकाल लागल्यावर नव्वद टक्क्यांवर गुण प्राप्त करणारे विद्यार्थीपण नोंदणी न केल्याने या मोफत प्रशिक्षणापासून वंचित राहण्याची आपत्ती आहे. निराश विद्यार्थ्यांची मनस्थिती पाहून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांची भेट घेवून मुदतवाढ न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. मागणी मान्य करीत पुढील सात दिवसांची मुदत वाढवून देण्यात आल्याची माहिती प्रा. गमे यांनी दिली आहे. आता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करीत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आहे.