नागपूर : ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या योजना राबवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (महाज्योती) पुढील वर्षांसाठी २५० कोटी रुपये दिले जाणार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही रक्कम ५० कोटींनी कमी आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी महाज्योतीला २०२१- २२ या वर्षांकरिता १५० कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर आणखी १५० कोटींची वाढ केली होती. अशाप्रकारे ३०० कोटी महाज्योतीला मिळाल होते. आता २०२२-२३ या आर्थिक वर्षांत २५० कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली ११ ऑगस्ट २०२० ला महाज्योतीचे संचालक मंडळ निर्माण करण्यात आले. तो करोनाचा कालखंड होता. अत्यंत कमी मनुष्यबळ होते.
अशावेळी विद्यार्थी हिताच्या विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेण्याचे आव्हान समोर होते. या संस्थेने अशा योजना विनामूल्य सुरू केल्या. यात एमपीएससी, यूपीएससी, पोलीस परीक्षा प्रशिक्षण, पीएचडी संशोधक फेलोशिप या योजना आहेत. सोबतच ग्रामीण भागातील अकरावी विज्ञानमध्ये शिकणाऱ्या व इंजिनिअिरग, मेडिकल प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या दहा हजारांवर जेईई नीट प्रशिक्षणार्थीना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण, मोफत ब्रँडेड कंपनीचा टॅब व दररोजचे सहा जीबी मोफत इंटरनेट ही योजना सुरू करण्यात आली आहे.महाज्योतीचे स्वत:चे प्रशासकीय कार्यालय नागपूर मुख्यालयी व्हावे म्हणून वडेट्टीवार यांनी, सिव्हिल लाईनमधील पाच एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवून दिली. या जागेची किंमत म्हणून २६ कोटींचा भरणा केला.
सर्व विभागात कार्यालय
महाज्योतीचे विभागीय कार्यालय सर्व महसूल विभागात सुरू करण्यात येत आहेत. औरंगाबाद, नाशिक व पुणे येथे सुरू झालेल्या महाज्योतीच्या विभागीय कार्यालयासाठी, शासनाच्या जागा मिळवण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर प्रस्ताव सादर केले आहेत. आवश्यकतेनुसार निधी पुन्हा वाढवून दिला जाईल. त्यासाठी संचालक मंडळ पाठपुरावा देखील करीत असते, असे महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी सांगितले.