वर्धा : महाज्योतीने अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या व जेईई, नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना १८ महिन्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ब्रँडेड कंपनीचा टॅब कायमस्वरुपी देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
या कालावधीत रोज सहा जीबी इंटरनेट डेटाही मोफत पुरविण्यात आला. दोन वर्षे या योजनेचा हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ओबीसी विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी टॅब देण्यामागे एक हेतू होता, असे महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे निदर्शनास आणतात. म्हणजे या पात्रता परीक्षा आटोपल्यावरसुद्धा विद्यार्थ्यांना इतर स्पर्धा तसेच युट्यूबवरील स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण मोफत घेता यावे म्हणून टॅब कायमस्वरुपी देण्यात आले होते. कालावधी संपल्यावर इंटरनेट डेटा मोफत देणे नियमानुसार बंद करण्यात आले. पण दिलेले टॅब लॉक करण्याचा निर्णय घेतला गेला. लॉक झाल्याने ते टॅब आता निरुपयोगी ठरले आहे.
हेही वाचा – ऐकावे ते नवलच… गर्भाची वाढ कातडीखाली; जगातली पहिली आणि वैद्यकीय शास्त्रातील दुर्मिळ घटना
टॅब या पद्धतीने लॉक करण्याचा कसलाच ठराव तत्कालीन संचालक मंडळाने घेतलेला नव्हता, असे गमे स्पष्ट करतात. हे सर्व विद्यार्थी सज्ञान असल्याने त्यांना टॅब वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे वंचित झालेल्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीकडे विचारणा केली. कॉल सेंटरवर फोन उचलल्या जात नाही. तक्रारीची दखल घेतल्या जात नसल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. ही भावना विद्यार्थ्यांनी गमे यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी यावर उत्तर मागितले पण मिळाले नाही. म्हणून १५ दिवसांत टॅब सुविधा पूर्ववत न झाल्यास महाज्योतीच्या कार्यालयापुढे समता परिषदेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही अधिकारी ओबीसी विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.