‘महाज्योती’च्या गोंधळाची दोन वर्षे पूर्ण
नागपूर : ‘महाज्योती’ संस्थेला गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना राबवता आल्या नाहीत. मात्र, योजनांच्या प्रसिद्धीच्या चित्ररथावर दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
महाज्योतीला ९ ऑगस्टला दोन वर्षे व संचालकांच्या नेमणुकीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या कारभाराचा लेखाजोखा घेण्यात आला. महाज्योतीने ३१ मे २०२१ च्या बैठकीत संस्थेच्या प्रसिद्धीसाठी चित्ररथाचा प्रस्ताव मंजूर के ला आहे. याद्वारे एका व्हॅनवर मोठा स्क्रीन लावून गावातील लोकांना माहिती दिली जाणार आहे. त्यावर दोन कोटी खर्च केले जाईल. अशा जाहिरातबाजीला संचालक मंडळातील दोन संचालकांनी विरोध केला आहे.
महाज्योतीच्या योजना दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात फिरवण्यासाठी चित्ररथावर कोटय़वधी रुपये खर्च न करण्याची सूचना एका संचालकांनी के ली. आजच्या स्मार्टफोनच्या व डिजिटल टीव्हीच्या काळात रस्त्यावर जाऊन व्हॅनवरचा स्क्रीन कोण पाहणार आहे. हे हास्यास्पद असून करोनाच्या काळात रस्त्यावर अशा प्रकारे गर्दी गोळा करणेही धोक्याचे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या चित्ररथाला मिनिटाप्रमाणे खर्च दिला जाणार असून तासाला लाखो रुपये दिले जाणार आहे. चित्ररथ किती वेळ चालला हे गावातील सरपंचापासून ज्याचा संस्थेशी संबंध नाही असे कुणीही प्रमाणित करू शकणार आहे. चित्ररथ न फिरवताही संबंधितांकडून प्रमाणपत्र घेतले जाईल. हा प्रकार गैरव्यवहाराला चालना देणारा आहे.
दरम्यान, केवळ आभासी प्रसिद्धीसाठी दोन कोटी रुपये खर्च करणे चुकीचे आहे, असे एका संचालकांनी म्हटले आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांची पोलीस प्रशिक्षण आणि नीट-सीईटीमधील उपस्थिती नगण्य आहे. यूपीएससी मुख्य परीक्षा पास झालेल्या ओबीसींच्या सर्व विद्यार्थ्यांना दिल्लीला मुलाखतीस जाण्यासाठी प्रत्येकी २५ हजारांचा निधी दिला जातो. सारथीसुद्धा हीच योजना राबवते. सारथीमध्ये मराठा व कुणबी या दोन जाती येतात. त्या विद्यार्थ्यांना महाज्योतीनेदेखील २५ हजार रुपये दिले.
प्रशिक्षकांवरही उधळपट्टी
महाज्योतीकडून ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकांना प्रतितास तीन हजार वेतन मानधन दिले जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासन पीएचडी उत्तीर्ण प्राध्यापकाला ६०० रुपये प्रतितास वेतन देते. अनुदान आयोगाचे वेतन ७२ हजार रुपये ठरवले आहे. एवढी पात्रता नसलेल्या प्रशिक्षकांना महाज्योती एका तासासाठी लाखभर रुपये महिन्याचे वेतन दिले जात असेल, तर ओबीसींच्या पैशाची ही उधळपट्टी आहे. त्यावर संचालकांनी आक्षेप घेतले आहेत.
महाज्योतीच्या कार्यप्रणालीमध्ये ज्या काही त्रुटी असतील, त्या आम्ही मान्य करतो, कारण त्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन झाल्याशिवाय त्यात सुधारणा करून विद्यार्थीभिमुख कार्य करता येणार नाही. – दिवाकर गमे, संचालक, महाज्योती