लोकसत्ता टीम
अकोला : नवी दिल्ली येथील चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर आता मध्य रेल्वे विभाग सतर्क झाला आहे. महाकुंभमेळासाठी प्रयागराज येथे जाणाऱ्या भाविकांना विनाव्यत्यय प्रवास अनुभव मिळावा, यासाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे सेवा, अतिरिक्त प्रवाशी सुविधा आणि गर्दी व्यवस्थापन धोरणांसह सर्वसमावेशक व्यवस्था अंमलात आणल्या आहेत.
प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामोरे जाण्यासाठी मध्य रेल्वेने महाकुंभमेळासाठी ४२ विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले. या व्यतिरिक्त इतर रेल्वे विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या अधिकच्या विशेष गाड्या मध्य रेल्वेच्या स्थानकांवरून जातील. त्यामुळे प्रवाशांना आणखी सुविधा उपलब्ध होईल. गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वेस्थानकांवर मदत केंद्र, अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रतिक्षित प्रवाशांसाठी प्रमुख स्थानकांवर जमाव क्षेत्रे, गर्दी टाळण्यासाठी सरकते जिने आणि उद्वाहकांमध्ये नियंत्रित प्रवेश, दुभाजकांच्या मदतीने पादचारी पुलावर एक दिशा मार्गांची अंमलबजावणी, सीसीटीव्ही देखरेख आणि घोषणांद्वारे नियोजित वेळेचे व्यवस्थापन, फलाटावर एकत्रितपणे गर्दी असलेल्या गाड्या येऊ नयेत, यासाठी रेल्वे गाड्यांचे धोरणात्मक नियोजन, सर्व प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दल तसेच तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह रांग व्यवस्थापन प्रणाली आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
एखादी गाडी आपत्कालीन साखळीने किंवा इतर कारणांमुळे थांबली तर, प्रवाशांना माहिती देण्यासाठी, चुकीची माहिती रोखण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे कर्मचारी ताबडतोब खाली उतरतील. जवळील स्थानके आणि आपत्कालीन नियंत्रण केंद्रांना इतर जाणाऱ्या गाड्यांचे नियमन करण्यासाठी सतर्क केले जाणार आहे. प्रवाशांना तत्काळ माहिती देण्यासाठी उद्घोषणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
तिकिट विक्रीचे बारकाईने निरीक्षण
वाढत्या मागणीमुळे ‘यूटीएस’ तिकिट विक्रीचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. तिकीट तपासणी कर्मचारी सेवेसाठी असून या कर्मचाऱ्यांना आरक्षित प्रवाशांना मदत करणे, आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवासी व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी वाणिज्यिक अधिकारी सत्रांमध्ये तैनात आहेत. गाड्या येण्यापूर्वी ३० मिनिटे आधीपासून उद्घोषणा प्रणालीवर सतत घोषणा केली जात आहे. वाणिज्यिक अधिकारी विशेषतः प्रवासी प्रस्थान होईपर्यंत उपस्थित आहेत. डब्ब्यांची स्थिती मागील स्थानकावरून निश्चित केली जात असून आगाऊ प्रदर्शित करण्यात येत आहे. अनधिकृत खानपान होणार नाही याची खात्री करण्यासाठी खानपान व्यवस्थापनाचे नियोजन असून यामुळे फलाटावरील गर्दीत घट होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.