नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (१४ऑक्टोबर ) स.११ वा झिरो माईल मेट्रो स्टेशन जवळील मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायंस या प्रस्तावित भुयारी मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
प्रस्तावित भुयारी मार्ग हा ८७० मीटर लांब असून याठिकाणी तीन प्रवेशद्वार असेल. या प्रकल्पाची एकूण किंमत ७९.६७ कोटी एवढी आहे .केंद्रीय रस्ते निधीतून हे काम केले जाईल. या भुयारी मार्गामुळे मानस चौक ते लोखंडी पूल (लोहा पुल) येथील गर्दी कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. सदर भुयारी मार्ग हा वर्धा रोड (राष्ट्रीय महामार्ग) च्या दोन्ही बाजूंनी असेल.
हेही वाचा >>> निराधारांची दिवाळी होणार गोड!; अनुदानात वाढ, आता १५०० प्रति महिना मिळणार
प्रस्तावित भुयारी मार्गामुळे भवन शाळा, बीएसएनएल कार्यालय, वनविभाग कार्यालय यासारख्या नामांकित संस्थांसह जवळील परिसरातील गर्दी कमी करण्यात मदत होईल. मानस चौक,लोखंडी पूल (लोहा पुल), झिरो माईल, वर्धा रोड, अंसारी रोड यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असलेल्या संपूर्ण परिसरात सर्वत्र वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते प्रस्तावित भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर या भागातील गर्दी कमी होण्यास मदत होईल.