लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर खासगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आता या मृतांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून महामार्गावर चक्क महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आले. एवढेच नव्हे तर महामृत्युंजय मंत्राचा सव्वाकोटी जपही करण्यात आला. एकीकडे अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी शास्त्रीय उपाययोजना करण्यात येत असतानाच महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यामुळे शासन व राज्य रस्ते विकास महामंडळ हादरले, समाजमन सुन्न झाले. याच परिसरात अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालविकास मार्ग दिंडोरी प्रणितच्यावतीने याठिकाणी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली. सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला. अपघातात मृत्यू झालेल्या २५ जणांच्या आत्म्यास शांती मिळावी व भविष्यात अपघात होऊ या उदात्त हेतूने हा विधी करण्यात आल्याचे सांगितले जाते. सुमारे दीडशे महिला-पुरुष भाविक यात सहभागी झाले होते. सिंदखेड राजा केंद्राचे प्रतिनिधी नीलेश आढाव यांनी यासाठी पुढाकर घेतला.

आणखी वाचा-मागच्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमीच! जून कोरडा, जुलैमध्ये प्रमाण वाढले

जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आले आहे. यामुळे आजूबाजूच्या पाच-दहा किलोमीटरमध्ये अपघात होणार नाही तसेच अपघात झाला तर मृत्यू होणार नाही, असा दावा स्वामी समर्थ सेवा केंद्र समन्वयकांनी केला आहे. दैवीशक्तीचा दावा करणे आणि त्यातून लोकांना फसवणे, ठगवणे हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे. स्वामी समर्थ साधकांनीदेखील याचा निषेध करणे आवश्यक आहे, असेही डॉ. दाभोलकर यांनी म्हटले आहे.