अकोला : बेरोजगार उमेदवारांना महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महानिर्मितीच्या पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रामध्ये विविध १४० पदांवर आयटीआय शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. उमेदवारांना ९ मेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महानिर्मितीच्या पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या आस्थापनेवर २०२५-२६ या सत्रासाठी आय.टी.आय. शिकाऊ उमेदवारांच्या जागा भरल्या जाणार आहेत. टर्नर (कातारी) आठ, मशिनिस्ट (यांत्रिकी) सात, इलेक्ट्रीशियन (विजतंत्री) २५, वायरमन (तारतंत्री) १०, फिटर (जोडारी) ३०, वेल्डर (संधाता) ३०, कोपा १०, मेकॅनिक डिझेल १५, प्लंबर (नळ कारागीर) पाच अशा एकूण १४० जागा भरल्या जाणार आहेत.
आय.टी.आय. उत्तीर्ण शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठी उमेदवार ०९ मेपर्यंत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिय http://www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर सुरू राहील. नोंदणी तसेच प्रोफाईल अद्ययावत करून संकेतस्थळावरील आस्थापना कोड क्र. ई१०१६२७००६९५ पर्याय निवडून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छूक उमेदवाराने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून व्यवसाय परीक्षेत मागासवर्गीय उत्तीर्ण उमेदवारास कमीत कमी ५५ टक्के गुण व खुल्या प्रवर्गातील कमीत कमी ६० टक्के गुण आवश्यक आहे. उत्तीर्ण झालेले सत्र २०२१ पासूनचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. कागदपत्रे संबंधित पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामध्ये आयटीआय एकत्रित अंतिम सेमिस्टरची गुणपत्रिका, इयत्ता १० ची गुणपत्रिका, रहिवासी दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राचा समावेश आहे.
स्थानिक उमेदवारांसाठी प्रकल्पबाधित गावे अंतर्गत पारस, कोळासा, मनारखेड, मांडोली, सातरगांव आदी गावे येतात. महानिर्मिती कंपनीतील प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आवश्यक राहील. कार्यरत कर्मचाऱ्यांचे पाल्य यांच्यासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र आवश्यक राहील.
सर्वसाधारण उमेदवार व स्थानिक उमेदवार, महानिर्मिती प्रकल्पग्रस्त उमेदवार आणि महानिर्मिती कार्यरत कर्मचाऱ्यांचे पाल्य यांच्या आयटीआय एकत्रित अंतिम सेमिस्टरची गुणपत्रिका गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. ०९ मे २०२५ रोजी उमेदवारांचे वय १८ वषर्षापेक्षा कमी व ३८ वर्षपेक्षा जास्त नसावे, तसेच मागासवर्गीय उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्ष शिथील केली आहेत. संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कुठल्याही माध्यमातून केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे महानिर्मितीच्या पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांनी स्पष्ट केले.