नागपूर : महानिर्मितीच्या कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंता पदभरती प्रक्रियेची प्रक्रिया दोन वर्षे दोन महिन्यानंतरही पूर्ण झालेली नाही. भरती प्रक्रियेतील पहिल्या प्रतीक्षा यादीतील रुजू उमेदवारांची नावे दुसऱ्याही प्रतीक्षा यादीत नावे आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महानिर्मितीमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये कनिष्ठ अभियंत्यांची ३२२ आणि सहाय्यक अभियंत्यांची ३३९ अशा एकूण ६६१ पदांसाठी जाहिरात निघाली. २६, २७ आणि २८ एप्रिल २०२३ ला परीक्षा झाली. निकाल १८ ऑगस्ट २०२३ रोजी लागला. त्यानंतर ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान कागदपत्रांची पडताळणी होऊन जानेवारी २०२४ पासून २४३ कनिष्ठ अभियंता आणि २५१ सहाय्यक अभियंत्यांना नियुक्तीपत्र दिले गेले.

हेही वाचा : Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, “आज कुणालाही आमदार म्हणून निवडून आणू शकतो, मात्र त्यावेळी सुमतीताईंना….”

महानिर्मितीने निवड यादीसोबतच प्रतीक्षा यादीही लावली होती. परंतु, प्रतीक्षा यादीत कमी उमेदवारांची नावे होती. दरम्यान, निवड यादीतील उमेदवारांनी निदर्शनात आणलेला घोळ ‘लोकसत्ता’ने पुढे आणला होता. त्यानंतर १६ ऑगस्टला महानिर्मितीकडून दुसरी प्रतीक्षा यादी प्रकाशित केली गेली. त्यात सहाय्यक अभियंते ३६० आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या ३०१ उमेदवारांचा समावेश होता. सध्या महानिर्मितीमध्ये सहाय्यक अभियंत्यांची सुमारे ९६ तर कनिष्ठ अभियंत्यांची सुमारे ११२ पदे रिक्त आहेत. परंतु, या दुसऱ्या प्रतीक्षा यादीत पहिल्या यादीतील सेवेवर रुजू झालेल्या सहाय्यक अभियंत्यांसाठीच्या ४० आणि कनिष्ठ अभियंत्यांसाठीच्या ३२ उमेदवारांचाही समावेश आहे. त्यामुळे सेवेवर रूजू झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या प्रतीक्षा यादीत टाकण्याचे कारण काय, असा प्रश्न प्रतीक्षेतील उमेदवारांनी केला आहे.

उमेदवारांचे म्हणणे काय?

महानिर्मितीच्या पदभरतीची वैधता १८ ऑगस्टला संपुष्टात येणार असताना १६ ऑगस्टला दुसरी प्रतीक्षा यादी प्रकाशित होऊन त्याला एक वर्षे मुदतवाढ मिळाली. पहिल्या यादीतील रूजू झालेल्या उमेदवारांची नावे दुसऱ्या यादीत आहेत. सोबत या प्रक्रियेबाबत त्यांच्या संकेतस्थळावर टाकलेले विविध आदेश महानिर्मितीने अचानक गायब केल्याने ही प्रक्रिया रद्द होण्याची भीती असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. याबाबत एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनाही निवेदन दिले आहे. महानिर्मितीच्या मुख्यालयाकडे विचारणा केल्यावर संकेतस्थळ बघण्याचा सल्ला मिळत असल्याचे उमेदवार सांगतात.

हेही वाचा : गडकरी करणार फडणवीसांचा सत्कार, काय आहे कारण ?

मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार २०२२ मधील पदभरतीच्या जाहिरातीनुसार विस्तारित प्रतीक्षा यादी प्रकाशित केली असून त्यात जुनी व नवीन प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नावे आहेत. दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सुमारे एक ते दोन आठवड्यात कागदपत्र पडताळणीला बोलावून एक महिन्यात प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पारदर्शी आहे.

राहुल नाले, मुख्य अभियंता (तांत्रिक), महानिर्मिती, मुंबई.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahanirmiti recruitment process not completed even after two years two months mnb 82 css