नागपूर: राज्यातील सर्वाधिक वीज निर्मिती करणाऱ्या महानिर्मितीकडून २०२४- २५ या आर्थिक वर्षात वीज निर्मितीचा विक्रम स्थापित करण्यात आला आहे. उन्हाळ्यात राज्यात विजेची मागणी वाढते, यासाठी दरवर्षी महानिर्मितीतर्फे सुक्ष्म नियोजन केले जाते. सद्यस्थितीत राज्याची विजेची एकूण मागणी २९ हजार ५०० मेगावॅटच्या घरात पोहोचली असून यासाठी महानिर्मिती सज्ज आहे.
महानिर्मितीने मार्च २०२५ मध्ये मासिक औष्णिक महत्तम ५ हजार ३२८ दशलक्ष युनिट्स इतके विक्रमी वीज उत्पादन केले आहे. उरण वायू वीज केंद्राने मागील ५ वर्षांतील सर्वात जास्त म्हणजे २ हजार ४७३ दशलक्ष युनिट्स वीज उत्पादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने सन २०२४-२५ मध्ये निर्धारित केलेल्या लक्ष्यास अनुसरून महानिर्मितीच्या अपारंपरिक ऊर्जा, पुणे मंडळाने ४५४.४० दशलक्ष युनिट्स वीज उत्पादनाचे लक्ष्य गाठले आहे. राज्यात २०२४- २५ या आर्थिक वर्षात एकूण ६१ हजार ४५६ दशलक्ष युनिट्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती झाली. त्यामुळे सन २०२३- २४ चा ६१ हजार ४३९ दशलक्ष युनिट्स वीजनिर्मितीचा विक्रम यंदा मोडला आहे. महानिर्मितीने सातत्याने उच्चतम कामगिरी नोंदवत अनेक उच्चांक गाठले आहेत. औष्णिक संचांची उपलब्धता, आवश्यक देखभाल-दुरुस्ती, भांडवली स्वरूपाची कामे याकडे विशेष भर दिल्याने यावर्षी महानिर्मितीच्या १५ संचांतून १०० दिवसांपेक्षा जास्त अखंडित वीज उत्पादन झाले आहे.
उन्हाळ्यात महानिर्मितीकडे कोळसा किती?
महानिर्मितीने प्रभावी इंधन व्यवस्थापनाची जोड दिल्याने वीज उत्पादनासाठी सुमारे २२.५ लक्ष मेट्रिक टन इतका कोळसा साठा सद्य परिस्थितीत उपलब्ध आहे. त्यामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी महानिर्मितीचा विविध स्तरावर पाठपुरावा विशेषतः कोळसा मंत्रालय, कोळसा कंपन्या आणि रेल्वे प्रशासनासोबत समन्वय सुरु आहे.
आवश्यक जलसाठ्याचा लाभ काय? यंदा वीज उत्पादनासाठी राज्यात आवश्यक जलसाठा संबंधित धरणांमध्ये पुरेसा उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला आवश्यक मागणीनुसार अखंडित वीज उत्पादन करण्यासाठी महानिर्मिती प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, संचालक मंडळ आणि अधिकारी- तंत्रज्ञ-कर्मचारी राज्यातील जनतेला मागणीनुसार अखंडित वीज उत्पादन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा महानिर्मितीचा दावा आहे.