इतिहास आणि जनभावनांचा विचार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : ब्रिटिशकालीन आणि कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारितील महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने जीवदान दिले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने काढलेल्या मान्यतेच्या पाश्र्वभूमीवर या खात्याचे सचिव सी.के. मिश्रा यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. प्राणिसंग्रहालयाचा आराखडा त्वरित मंजूर करून पुढील एक वर्षांसाठी प्राणिसंग्रहालयाला मान्यता देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने नियमांवर बोट ठेवत डिसेंबर २०१८च्या पहिल्या आठवडय़ात या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती. २०११ मध्ये प्राणिसंग्रहालयाचा बृहृत विकास आराखडा प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. प्राधिकरणाच्या सूचनेनुसार तीनवेळा आराखडा अद्ययावत करण्यात आला. २०१६ पासून तो प्राधिकरणाकडे प्रलंबित होता. त्यातील त्रुटी दूर करण्याच्या अटीवर ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, प्राणिसंग्रहालय प्रशासन त्यात अपयशी ठरले. दरम्यान, फेब्रुवारी २०१८ मध्ये प्राणिसंग्रहालयाचा विकास आराखडा सादर करण्यात आला. मे २०१८ मध्ये नवी दिल्ली येथे सुनावणीदरम्यान तो मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालय प्रशासनाला दिले. मात्र, तो मंजूर किंवा नामंजूर करण्याऐवजी थेट मान्यता रद्द करण्याचे पत्रच प्राधिकरणाने दिले. याबाबत ११ मार्चला केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल खात्याच्या सचिवांसमोर सुनावणी झाली. यावेळी महाराजबागचे नियंत्रक डॉ. देवानंद पंचभाई, प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर तसेच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून डॉ. ब्रिजकिशोर गुप्ता उपस्थित होते. प्राधिकरणाकडे २०१६ पासून आराखडा प्रलंबित आहे. त्यामुळे विकास कामे नियमानुसार सुरू करता आलेली नाहीत, अशी बाजू डॉ. पंचभाई यांनी मांडली. त्यावर सी.के. मिश्रा यांनी प्राधिकरणाचे ब्रिजकिशोर गुप्ता यांना विचारले असता त्यांना उत्तर देता आले नाही. डॉ. बावस्कर यांनीही महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचा इतिहास तसेच नागरिकांच्या या प्राणिसंग्रहालयाची जुळलेल्या भावना मांडल्या. यावर सी.के. मिश्रा यांनी येत्या महिनाभरात आराखडय़ाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केंद्रीय प्राणिसंग्रहालय  अधिकाऱ्यांना केल्या.

मान्यता का रद्द झाली होती?

* संरक्षक भिंतीचा अभाव

* पूर्णवेळ जीव वैज्ञानिक, शिक्षणाधिकारी, प्राणीसंग्रहपाल नसणे

* वन्यप्राण्यांचे पिंजरे अद्ययावत नसणे

* विना परवाना वन्यप्राणी मुक्त करणे

* प्रेक्षकांसाठी अद्ययावत सोयी नसणे

* प्राणिसंग्रहालयात नागरिकांना ‘मॉर्निग वॉक’ला परवानगी

आता कोणत्या अटी घातल्या?

* मॉर्निग वॉकला बंदी घालावी.

* नियमानुसार कागदपत्रे ठेवावी.

* नियमानुसार विकास कार्य लवकरात लवकर सुरू करावे.

* महाराजबाग विकास परियोजना आणि आराखडा मंजुरीचा निर्णय एक महिन्याच्या आत घ्यावा.

* प्राधिकरण अधिकाऱ्यांनी वर्षभरात प्राणिसंग्रहालयातील विकास कामांचा आढावा घ्यावा.

* प्राधिकरण मान्यतेच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालय प्रशासनाने प्राणिसंग्रहालय अद्ययावत करावे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharaj bagh zoo plan approved by central zoo authority