रस्ते विकासात बळी जाण्याची शक्यता
ब्रिटिशकालीन वैभवाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू उपराजधानीचा मान आहे. झिरो माईल, मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) आणि महाराजबाग या वास्तूंची गाथा नागपूरकर अभिमानाने बाहेरून येणाऱ्यांना सांगतात. मात्र, गेल्या काही वषार्ंत विविध कारणांमुळे या वास्तूंना लागलेली उतरती कळा शहराचे वैभव संपुष्टात आणण्याचा प्रकार सुरू झाला आहे. मध्यवर्ती संग्रहालयाची दुरावस्था कुणापासूनही लपून राहिलेली नाही आणि स्थानिक प्रशासन महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला त्याच वाटेवर नेण्याच्या तयारीत आहे. रस्ते विकासाच्या नावाखाली कुरतडल्या जाणाऱ्या महाराजबागेच्या संरक्षणासाठी आता नागरिकच पुढे सरसावले आहेत.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला वनविकास महामंडळाच्या हातात सोपवण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचे काम सुरू झाले. ते होईल का आणि झाले तर कधी होईल हा भाग वेगळा, पण त्याचवेळी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या अस्तित्वावर गंडांतर येणार हे निश्चित झाले. रस्ते विकासाच्या निमित्ताने हे गंडांतर महाराजबागेवर आले असून मोठे रस्ते बनवण्याच्या नादात महाराजबाग मात्र कुरतडली जाणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या महाराजबागेच्या दुर्दशेने चिंतित होऊन त्याचे अस्तित्व कायम राखण्यासाठी नागरिकांनी महाराजबाग प्रभात मित्र मंडळाची स्थापना केली. महाराजबागेच्या अस्तित्वासाठी कायम या मंडळाने लढा दिला आहे. त्यामुळेच आता महाराजबागेतील शेकडो वृक्षांची तोड करून प्राणिसंग्रहालयात प्रवेश करून जाणाऱ्या रस्त्याला विरोध करण्यासाठी या मंडळाने पुढाकार घेतला आहे. शहरातील अनेक बागांचे सिमेंटच्या बागात रूपांतर झाले आहे. आता ब्रिटिशांची देण असलेल्या महाराजबागेचा क्रमांक लावण्याचे षडयंत्र आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार या मंडळाने केला आहे.
कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या महाराजबागेच्या बाजूने दोन रस्ते मोठे करण्यात येत आहेत. या रस्ते विकासात कृषी महाविद्यालयाची सुमारे सात हजार चौरस मीटर जागा जाणार आहे. उत्तर अंबाझरी मार्ग, रामदासपेठेकडून एक मोठा रस्ता महानगरपालिका बांधणार असून एक रस्ता महाराजबागेच्या नालीवरून जाणार आहे. यात महाराजबागेतील नर्सरीचे प्रवेशद्वार आणि मुख्यद्वारसुद्धा तुटण्याची दाट शक्यता आहे. महाराजबागेतील प्रसाधनगृह सुद्धा यात तोडले जाणार आहे. मातृसेवा संघापासून काढलेला रस्ता व्हेरायटी चौकाजवळ नेणार असून उत्तर अंबाझरी मार्गाला तो जुळणार आहे. मोरभवनमधून जाणाऱ्या बसेससाठी महाराजबागेच्या मोडतोडीचा हा घाट महापालिकेने रचला आहे. नवीन येणाऱ्या सुमारे २००-२५० बसेसकरिता रस्ते तयार केले जात आहेत. या रस्त्यांमध्ये महाराजबागेचा बळी दिला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा