नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. कॉपीमुक्त अभियानासाठी यंदा प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात केले आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यात मोठे यश मिळत आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने ४४ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यंदा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पाच भरारी पथके आहेत. याशिवाय कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील महसुली विभागाचे भरारी पथकही प्रत्येक परीक्षा केंद्रांवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे गैरप्रकाराला आळा बसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे परीक्षा दरम्यान एका तोतया उमेदवारांना पकडण्यात भरारी पथकाला यश आलेले आहे. शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने बारावीच्या परीक्षेदरम्यान कारवाई करत एका तोतया परीक्षार्थीला रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. तोतया परीक्षार्थींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसे उघड झाले गौडबंगाल?
सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यातच परीक्षेदरम्यान भरारी पथकाने तुर्काबाद खराडी येथील हरी ओम ज्युनियर कॉलेज (परीक्षा केंद्र क्र. ००५८) येथे अचानक भेट दिली. त्यावेळी १२ वाणिज्य शाखेचा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हा पेपर सुरू होता. या केंद्रावर एकूण २९ विद्यार्थ्यांची नोंद असून त्यापैकी २७ विद्यार्थी परीक्षेला हजर होते. तर दोन विद्यार्थी अनुपस्थित होते. पथकाने केंद्राची तपासणी सुरू केली असता एका परीक्षार्थीबाबत शंका निर्माण झाली. अधिकाऱ्यांनी त्याला वडिलांचे नाव विचारले असता, तो त्याच्या वडिलांचे नाव सांगू शकला नाही. तसेच, त्याच्या प्रवेश पत्रावर जन्मतारखेमध्ये पेनने खाडाखोड केल्याचे आढळले. विशेष म्हणजे, प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्र संचालकाची सही आणि शिक्का देखील नव्हता. त्यामुळे भरारी पथकाने त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. परीक्षार्थींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान
राज्यातील बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली. राज्यात अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी, भरारी पथकाने नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारकडून यंदा बारावी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे. त्यासाठी, विशेष प्रयत्न केले जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी परीक्षा केंद्राबाहेर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र या बंदोबस्ताला न जुमानता अनेकांनी कॉप्या पुरवण्याच्या उद्योग केला आहे. काही टिकाणी थेट विद्युत रोहित्राजवळ असलेल्या खांबावर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालत कॉपी पुरवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत.