नागपूर : भारतातून २५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातून पुन्हा एकदा आठ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. देशातील पूर्वेत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि तीन तास, तर पश्चिम भारतातून केवळ एक तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण पाहता येणार आहे.
आठ नोव्हेंबरला दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका येथील काही भागातून दिसेल. पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगवताना खग्रास स्थिती असेल, पण चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. भारतीय वेळेनुसार आठ तारखेला दुपारी १.३२ मिनिटांनी छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. दोन वाजून ३९ मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होईल. तीन वाजून ४६ मिनिटांनी खग्रास ग्रहणाला सुरुवात होईल, तर पाच वाजून ११ मिनिटांनी खग्रास ग्रहण समाप्त होईल. सहा वाजून १९ मिनिटांनी खंडग्रास तर सात वाजून २६ मिनिटांनी छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल. ग्रहणाचा छायाकल्प काळ दोन तास १४ मिनिटे, खंडग्रास काळ दोन तास १५ मिनिटे तर खग्रास काळ एक तास २५ मिनिटे आणि एकूण ग्रहणाचा काळ पाच तास ५४ मिनिटे असेल.
हेही वाचा >>> अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; CM शिंदे, राज ठाकरेंच्या उपस्थित चित्रपटाची घोषणा
महाराष्ट्रातील वेळा?
गडचिरोली येथून पाच वाजून २९ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल आणि सात वाजून २६ मिनिटांनी संपेल. येथे सर्वाधिक एक तास ५६ मिनिटे ग्रहण दिसेल आणि ७० टक्के दिसेल. चंद्रपूर येथे पाच वाजून ३३ मिनिटांनी, नागपूर येथे पाच वाजून ३२ मिनिटांनी, यवतमाळ येथे पाच वाजून ३७ मिनिटांनी, अकोला येथे पाच वाजून ४१ मिनिटांनी, जळगाव येथे पाच वाजून ४६ मिनिटांनी, औरंगाबाद येथे पाच वाजून ५० मिनिटांनी, नाशिक येथे पाच वाजून ५५ मिनिटांनी, पुणे येथे पाच वाजून ५७ मिनिटांनी, मुंबई येथे सहा वाजून एक मिनिटाने ग्रहण दिसेल.
कधी दिसेल? भारतात चंद्रोदयासोबतच ग्रहण लागलेले असेल आणि सात वाजून २६ मिनिटांनी ते संपेल. पूर्व भारतात मोठे ग्रहण दिसेल, तर पूर्व-पश्चिम रेखांशानुसार ग्रहण लहान होत जाईल.
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातून ५.३० वाजता तर मुंबई येथून ६ वाजून एक मिनिटाने चंद्रोदयातच ग्रहण सुरू होईल. सर्व ठिकाणी सात वाजून २६ मिनिटाने ग्रहण संपेल. महाराष्ट्रात पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७० टक्के तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ टक्के ग्रहण दिसेल.
– प्रा. सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक व स्काय वॉच समूहाचे अध्यक्ष