‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतांना त्यांनी मला तिकिट दिले होते. त्यांच्यामुळे मी आमदार झालो, त्यामुळेच आज कृषिमंत्री म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे,’ असे वक्तव्य कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे जाहीर आभार मानले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे धनंजय मुंडे म्हणाले, स्व.गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांचा मोठा प्रभाव माझ्या राजकीय जीवनावर राहिला आहे.
हेही वाचा >>> केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर, ‘महात्मा गांधी म्हणत गावाकडे चला अन् आता…’
नितीन गडकरी यांच्यासमोर भाषण करण्याची संधी १०-१२ वर्षानंतर मिळाली. प्रदेशाध्यक्ष असतांना नितीन गडकरी यांनी मला उमेदवारी दिली नसती तर मी मंत्री, आमदार नसतो. आज मंत्री म्हणून तुमच्या समोर नितीन गडकरींमुळे बोलतोय. देशात आता विमानाने किंवा हेलिकॉप्टरने फिरण्यापेक्षा वाहनाने फिरायला मजा वाटते. नितीन गडकरींच्या मंत्रालयाने तयार केलेले सुरेख रस्ते त्यामागचे कारण आहे. लोकसभा निवडणुकीला आणखी बराच अवकाश आहे. त्यामुळे आताही कृषी मंत्रालयाची जबाबदारी नितीन गडकरींनी घेतल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे बदल निश्चित घडून येतील, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.