वर्धा: एखाद्या उत्पादनाचे अंगीभूत गुणधर्म कितीही उत्कृष्ट असो, पण जोवर त्यास राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत त्याचे खरे मूल्य कळत नाही.अशी अनेक उत्पादने कोपऱ्यात दडून बसली आहेत.जगात सर्वोत्कृष्ट असा आब असणारी हळद म्हणून येथील वायगावी हळदीची ओळख आहे. देशात पाच प्रकारची हळद पीकविली जाते. त्यात अव्वल असणारी ही हळद विदेशात पण निर्यात केल्या जाते. यात असणारे क्यूमेनीन हे घटक कर्करोगावर उपयुक्त व याच हळदीत त्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणून या हळदीस फार पूर्वी भौगोलिक मानांकन प्राप्त होऊन चुकले. या हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन समुद्रपूर तालुक्यातील वायगाव ईथे घेतल्या जाते. भौगोलिक मानांकन व औषधी गुणधर्म यामुळे हळदीस सर्वत्र मोठी मागणी असल्याचे चित्र आहे.

पण अन्न पदार्थात महत्वाचे स्थान व मानांकन असूनही ही हळद दुर्लक्षित असल्याची हळद उत्पादक शेतकऱ्यांची भावना आहे. वेगळे स्थान कां नाही, असा सवाल असतो. नागपुरात वनामती येथे झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात त्यांनी ही नाराजी नोंदविली. सरकारदारी या हळदीच्या विकास व उत्पादन वाढीसाठी काहीच प्रयत्न होत नाही. मूल्यवर्धन करण्यास दुर्लक्ष. उत्पादन ते मार्केटिंग या साखळीत असंख्य अडचणी. म्हणून बाजार समितीत खरेदी विक्रीचे स्वतंत्र दालन असावे. वेगळे गुणधर्म लक्षात घेऊन या हळदीस वेगळी किमान आधारभूत किंमत मिळावी. तारण योजना असावी. लागवड क्षेत्र विकसित व्हावे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळावे. भौगोलिक मानांकन म्हणून होणारी फसवणूक थांबावी. त्यासाठी संरक्षण समिती व विमा संरक्षण मिळावे. अश्या व अन्य मागण्या या हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या आहेत.

या भावना स्वतः कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी ऐकून घेतल्या. ते म्हणाले या समस्यांची नोंद घेत आहे. आवश्यक तो आराखडा तयार केल्या जात विकास योजना लागू करू. पुढील हंगामात शासन स्तरावर निर्णयक भूमिका घेण्यात येईल, अशी हमी कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली. शेतकरी चक्रधर भगत यांनी अडचणी मांडल्या. तसेच हळद उत्पादक संघाचे सुरज मोहिते, विठ्ठल कारवटकर, शोभा गायधने, विजय आरडे, नीतेश थूल, दीपक बरडे, किशोर घुमडे, रवींद्र वैद्य तसेच आत्माचे राजेश चांदेवार, साधना भोयर व मनोज गायधने यांनी बाजू मांडली. स्वतंत्र दालन केव्हा मिळणार, हा मुख्य प्रश्न आहे. कोरोना काळात ही हळद रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त म्हणून चांगलीच चर्चेत होती. हळदीचे कॅप्सूल मोठ्या प्रमाणात विकल्या गेले. विदेशातून मागणी झाली. पण तरीही ही हळद देशातच दुर्लक्षित, अशी स्थिती सांगितल्या जाते.

Story img Loader