अमरावती : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्याजवळ ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी महायुती आणि महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांमध्‍ये आरोप-प्रत्‍यारोप सुरू झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपच्‍या नेत्‍या चित्रा वाघ यांनी मंगळवारी अमरावतीत पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख यांच्‍यावर आरोप केला.  दहा किलोचा दगड गाडीच्‍या बोनेटवर पडतो, पण बोनेटला काहीही होत नाही. अनिल देशमुख यांनी सहानुभूती मिळवण्‍यासाठी हल्‍ल्‍याची घटना घडवून आणली का, याविषयी काही दिवसांतच पुराव्‍यानिशी आम्‍ही पर्दाफाश करू, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

हेही वाचा >>> ‘हिंदी चिनी भाई-भाई’च्या धर्तीवर ‘हलबा- मुस्लिम भाई-भाई’चे नारे, मध्य नागपुरात…

चित्रा वाघ म्‍हणाल्‍या, अनिल देशमुख यांचे स्‍टंट यापुर्वीही महाराष्‍ट्राने बघितले आहेत. त्‍यांनी हे सर्वकाही सहानुभूती मिळवण्‍यासाठी केले आहे का, हे आम्‍ही लवकरच पुराव्‍यानिशी समोर आणू. दरम्‍यान, काल रात्रीच भाजपचे धामणगाव रेल्‍वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्‍या भगिनी अर्चना रोठे यांच्‍यावर सातेफळ फाट्यावर चाकूहल्‍ला करण्‍यात आला.

त्‍यांच्‍यावर येथील एका खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. चित्रा वाघ यांनी रुग्‍णालयात पोहचून त्‍यांनी अर्चना रोठे यांची भेट घेतली. या हल्‍ल्‍याविषयी त्‍यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा >>> Vinod Tawade News: हा तर भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशातून मते विकत घेण्याचा प्रकार, तावडे प्रकरणावर पटोलेंचा आरोप

चित्रा वाघ म्‍हणाल्‍या, प्रताप अडसड यांच्या सर्व प्रचाराची धुरा त्यांच्या बहिणीकडे आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या गावा गावात जाऊन प्रचार करत होत्‍या. रात्री सातेफळ अज्ञातांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. अशा प्रकारचा भ्याड हल्ला सहन केला जाणार नाही. महाविकास आघाडी पराभवाच्या भीतीने गुंडगिरी करत आहे. पण जनता येणाऱ्या निवडणुकीत गुंडगिरीला मतदानातून उत्तर देईल. नवनीत राणांच्या सभेत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्यावर खुर्च्या भिरकावण्यात आल्या, थुंकण्यात आले. पण एकाही विरोधकाने या घटनेचा साधा निषेधही केला नाही. पुरोगामी म्हणवणारे विरोधक या महिला नेत्यांविरुद्ध घडलेल्या या निंदनीय घटनांविरुद्ध महाविकास आघाडीचे नेते एकही शब्द उच्चारायला तयार नाहीत. कोणत्याही विचारधारेच्या/ राजकीय पक्षाच्या नेत्यावर झालेला हल्ला हा निषेधार्हच आहे. पण विरोधक आपल्या सोयीनुसार दुटप्पी भूमिका घेत आहेत. पण ही भाजपची संस्कृती नाही. हल्लेखोरांची गय केली जाणार नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 anil deshmukh attack was stunt for sympathy says bjp leader chitra wagh mma 73 zws