नागपूर: महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही रामटेक, कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांना काँग्रेसकडून नोटीस बजाविण्यात आली होती. बंडाची तलवार म्यान करून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा. तसे न केल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. त्यानंतरही अर्ज माघार न घेतलेल्या आणि बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल, सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या जयश्री पाटील आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
प्रियंका गांधी तीन दिवस महाराष्ट्रात
काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच गॅरंटी आम्ही काल जाहीर केल्या आहेत. भारताचे भविष्य उज्वल करण्यासाठी या गॅरंटी महत्त्वाच्या आहेत. १३, १६ आणि १७ नोव्हेंबरला प्रियंका गांधी महाराष्ट्रात येत आहेत. मल्लिकार्जुन खरगे पाच दिवस महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. ज्या कांग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे त्यांना ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचा जाहीरनामा १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संजय राऊत, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.
हेही वाचा : गडचिरोली, आरमोरीत थेट; अहेरीत तिरंगी लढत
जयश्री पाटलांवरही कारवाई
लोकसभेमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघात राज्यभर गाजलेला सांगली पॅटर्न आता विधानसभेतही कायम राहिल्याचे दिसून येत आहे. सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्याला खासदार विशाल पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला. वसंतदादा कुटुंबात २०१४ नंतर तिकीट मिळाले नाही, आमची काय चूक झाली असा सवाल विशाल पाटील यांनी विचारला होता. काँग्रेसने आता जयश्री पाटील यांना निलंबित केले आहे.
हेही वाचा : यवतमाळ : कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, भाजप कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हा
राजेंद्र मुळक निलंबित
शिवसेना ठाकरे गटाने पहिल्याच यादीत रामटेके जागेवर विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. या जागेवर काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे. ते राज्याचे माजी ऊर्जा व वित्त राज्यमंत्री आहेत. ते पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यावरही काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे.