अमरावती : महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली, त्यावेळी महाविकास आघाडीकडून आमच्यावर टीका करण्यात आली. ही योजना फसवी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, राज्यातील अडीच कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत. विरोधक या योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात गेले, पण न्यायालयाने देखील योजना बंद करण्यास नकार दिला. महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात आहेत. त्यांच्या डोक्याचे नट कसण्याची गरज आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे बोलताना लगावला.
बडनेराचे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ बडनेरा मार्गावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. रवी राणा यांचे निवडणूक चिन्ह पाना आहे. हा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना राबवून महायुती सरकार पैशांचा चुराडा करीत असल्याचे सांगून महाविकास आघाडीच्या सावत्र भावांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. पण, आम्ही योजना बंद होऊ दिली नाही. भविष्यात देखील ही योजना बंद होणार नाही. या योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये भावाकडून ओवाळणी म्हणून मिळते. महायुतीची सत्ता पुन्हा आल्यानंतर महिलांच्या खात्यात दरमहा २१०० रुपये जमा होणार आहेत. महाविकास आघाडीचे नेते षडयंत्र करीत राहतील, पण आम्ही लोकहिताच्या योजना बंद पडू देणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नट कसण्यासाठी रवी राणांचा पाना मी वापरणार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
हेही वाचा – मतदान झाल्याबरोबर सरकारी योजनांचा खरा चेहरा…. शरद पवारांनी सांगितले भविष्यात काय घडणार?
देशातील महिला या अर्थव्यवस्थेच्या आणि समाजव्यवस्थेच्या केंद्रस्थानी याव्यात, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना आणल्या. ‘लखपती दीदी’ योजनेचा लाभ लाखो महिलांना मिळाला. आम्ही आगामी काळात राज्यात १ कोटी महिलांना लखपती करणार, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची व्यवस्था केली. लेक लाडकी योजना राबवली. एसटी बसमधून प्रवासासाठी पन्नास टक्के सवलत लागू केली. अशा अनेक लोकहिताच्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, असे ते म्हणाले.
आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात शेतमालाचे भाव हमीदरापेक्षा कमी झाले, तर त्यातील फरक आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत. हे सरकार लोकाभिमूख सरकार आहे, असे फडणवीस म्हणाले. या सभेला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, गुजरातचे मंत्री ऋषीकेश पटेल आदी उपस्थित होते.