अकोला : भाजपचे सलग १५ वर्षांपासून आमदार असलेल्या हरीश पिंपळे यांना उमेदवारीसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. उमेदवारीवर अनिश्चिततेचे सावट असताना भाजपच्या तिसऱ्या यादीत हरीश पिंपळे यांचे नाव झळकले. भाजपकडून आपल्याला सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळाल्याचे कळताच आमदार हरीश पिंपळेंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पिंपळेंना उमेदवारी मिळाल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. एका नेत्याने पाच वर्ष थांबण्याचा सल्ला दिला होता, असा गौप्यस्फोट देखील हरीश पिंपळे यांनी केला.
हेही वाचा >>> अकोला : काँग्रेसने साजिद खान यांच्यावरच दाखवला विश्वास, नाराज नेत्याने धरली ‘वंचित’ची वाट
भाजपने पहिल्या दोन याद्यांमध्ये मूर्तिजापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली नव्हती. विद्यमान आमदार पिंपळे यांच्या तिकीटावरून संभ्रमाचे वातावरण होते. त्यातच राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यामुळे रवी राठी भाजपमध्ये दाखल झाले. उमेदवारी कापण्याच्या अंदाजामुळे पिंपळेंसह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. वाशीमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांचा पत्ता कट केल्याने त्याची शक्यता अधिक वाढली. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पिंपळे यांना उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. पिंपळेंना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांनी गळ घातली. अखेर पक्षाच्या तिसऱ्या यादीत पिंपळे यांना स्थान देण्यात आले आहे. २०१९ मध्ये पिंपळे यांना वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांनी काट्याची लढत दिली होती. त्यामध्ये पिंपळे यांनी एक हजार ९१० मतांनी निसटता विजय मिळवला होता. आता पिंपळे यांच्यासमोर राष्ट्रवादी पवार गटाचे सम्राट डोंगरदिवे व वंचितचे डॉ. सुगत वाघमारे यांचे आव्हान राहील.
हेही वाचा >>> मोर्शीचा तिढा सुटला; काँग्रेसचे गिरीश कराळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार
मूर्तिजापूरमध्ये तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पिंपळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. १५ वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी पक्षाला संघटनात्मक बळकटी देण्याचे कार्य केले. गेल्या दोन-तीन दिवसांत घडलेल्या घडामोडीनंतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा अनुभव आला. एका मोठ्या नेत्याने पाच वर्ष थांबून जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावर पक्षाच्या आदेशापुढे जाणार नाही, असा शब्द दिला. मात्र, कार्यकर्त्यांनी जंग-जंग पछाडून पक्षाकडे माझ्या उमेदवारीची मागणी केली. बुथ प्रमुख, कार्यकर्त्यांच्या भरवशावर तिकीट मिळाले, असे हरीश पिंपळे म्हणाले. कार्यकर्त्यांचे ऋण कधीही फेडू शकणार नाही, असे सांगत हरीश पिंपळे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.